Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडं किती? स्टॉप्स अन् वेळापत्रकासह मोठे अपडेट्स, सर्व 12 स्टेशनची यादी अन् प्रवासाचा वेळ

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला असून या मार्गावरील ट्रायल्सच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांमध्ये तिकिटाच्या दराबाबत उत्सुकता वाढली आहे. बुलेट ट्रेनचे तिकीट किती असेल, ती किती स्थानकांवर थांबणार, एका ट्रेनमध्ये किती प्रवासी प्रवास करू शकतील आणि दिवसाला किती फेऱ्या होणार, याबाबत आता माहिती समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आहे. भारतीय रेल्वे आणि नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या मार्गावर दोन श्रेणीतील बुलेट ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात दिल्ली-वाराणसीसह इतर हायस्पीड रेल्वे मार्गांवरही अशाच प्रकारची व्यवस्था असू शकते.

जपानकडून ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन मिळण्यास विलंब होत असल्याने भारताने आता स्वतःच ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणारी E10 बुलेट ट्रेन विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. ही ‘मेड इन इंडिया’ बुलेट ट्रेन 2030 पर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं तिकीट किती असेल?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. NHSRCLच्या माहितीनुसार या प्रकल्पाचा खर्च सुरुवातीला सुमारे 1.1 लाख कोटी रुपये होता. आता तो वाढून सुमारे 2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला घेतलेल्या कर्जाचा व्याजदर मात्र केवळ 0.25 टक्के होता. वाढलेला खर्च पूर्ण करण्यासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात कर्ज घेण्याची योजना आहे.

बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबत सुरुवातीला सुमारे 3 हजार रुपये तिकीट दराचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चामुळे आता मुंबई-अहमदाबाद प्रवासाचे भाडे 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भाड्याचा अंतिम आणि अधिकृत आकडा अद्याप निश्चित झालेला नाही.

बुलेट ट्रेनच्या ट्रायल्स पुढील वर्षी एप्रिल-मेपासून सुरू करण्याची तयारी आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरत ते विलिमोरा या मार्गावर बुलेट ट्रेनच्या एका भागाचे उद्घाटन करण्याची योजना असल्याचे सांगण्यात आले आहे.

रॅपिड बुलेट ट्रेन म्हणजे काय?

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दोन प्रकारच्या सेवा असतील. त्यापैकी एक म्हणजे रॅपिड बुलेट ट्रेन. ही ट्रेन मार्गावरील प्रत्येक स्थानकावर थांबणार नाही. केवळ प्रमुख स्थानकांवरच तिचे थांबे असतील.

रॅपिड बुलेट ट्रेन साबरमती, वडोदरा, सूरत आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे 508 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

मोठ्या व्यावसायिक केंद्रांदरम्यान जलद प्रवासाची सुविधा देणे हा या सेवेचा उद्देश आहे. कमी स्थानकांवर थांबे असल्याने या ट्रेनचे भाडे तुलनेने अधिक असण्याची शक्यता आहे.

लोकल बुलेट ट्रेनमध्ये सर्व स्थानकांवर थांबा

दुसऱ्या प्रकारची सेवा म्हणजे लोकल बुलेट ट्रेन. ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग सध्या ताशी 320 किलोमीटरपर्यंत असू शकतो.

मात्र प्रत्येक स्थानकावर थांबा, प्रवाशांची चढ-उतार प्रक्रिया आणि पुन्हा वेग घेण्यासाठी लागणारा वेळ यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रवासासाठी सुमारे 3 तास लागू शकतात.

या लोकल बुलेट ट्रेनचे एकूण 12 स्थानकांवर थांबे असतील. यामध्ये साबरमती (अहमदाबाद), कालूपूर (अहमदाबाद), आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, विलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई (BKC) या स्थानकांचा समावेश आहे.

या सेवेचा फायदा केवळ मुंबई आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांनाच नव्हे तर वापी, भरूच, विरार आणि ठाणे यांसारख्या शहरांतील तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रवाशांनाही होणार आहे. या माध्यमातून छोट्या शहरांना आणि औद्योगिक पट्ट्यांना हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

दिवसाला बुलेट ट्रेनच्या किती फेऱ्या?

NHSRCLच्या सुरुवातीच्या नियोजनानुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या अप-डाऊन सेवांचा विचार करता दिवसभरात सुमारे 70 फेऱ्या करण्याची योजना आहे.

प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या सकाळ-संध्याकाळच्या व्यस्त वेळेत दर 20 मिनिटांनी, तर सामान्य वेळेत दर 30 मिनिटांनी बुलेट ट्रेन उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

बुलेट ट्रेन सेवा सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चालवण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

जपानची शिंकानसेन की स्वदेशी बुलेट ट्रेन?

मुंबई-अहमदाबाद मार्गावर जपानची प्रसिद्ध शिंकानसेन (Shinkansen) बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आहे. मात्र जपानकडून ट्रेनचे कोच मिळण्यास विलंब होत असल्याने 2027 पासून या मार्गावर स्वदेशी बनावटीचे B28 कोच वापरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे आणि BEML स्वदेशी बुलेट ट्रेनच्या चाचण्यांसाठी 8 कोचचा प्रोटोटाइप ट्रेनसेट तयार करत आहेत. भारताची स्वतःची ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणारी E10 बुलेट ट्रेन तयार करण्याच्या प्रयत्नांनाही यामुळे वेग मिळणार आहे.

बुलेट ट्रेनमध्ये किती प्रवासी बसू शकतील?

बुलेट ट्रेनमधील स्टँडर्ड म्हणजेच इकॉनॉमी क्लासच्या एका कोचमध्ये सुमारे 85 ते 100 प्रवासी बसू शकतील. तर एग्झिक्युटिव्ह किंवा बिझनेस क्लासच्या कोचमध्ये प्रवाशांना अधिक जागा मिळणार असल्याने त्यांची क्षमता सुमारे 50 ते 55 प्रवासी असेल.

10 कोचच्या ट्रेनमध्ये सुमारे 750 प्रवासी, तर 16 कोचच्या ट्रेनमध्ये सुमारे 1,250 ते 1,300 प्रवासी प्रवास करू शकतील.

मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी सुरुवातीला 24 ट्रेनसेट खरेदी करण्याची शक्यता आहे. प्रवाशांची मागणी वाढत गेल्यास ट्रेनसेटची संख्या दोन ते तीन पटीने वाढवली जाऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *