Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ मिळाला आहे. लवलिना बोर्गोहेन आणि नरेंद्र बेरवाल हे आपली मोहीम थेट उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय बॉक्सर्सच्या शानदार कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावण्याच्या आशा वाढल्या आहेत; मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण आहे.

या स्पर्धेत पुरुषांच्या सहा आणि महिलांच्या पाच वजन गटांचा समावेश आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन ब्राँझ अशी चार पदके जिंकली होती.

टोकियो ऑलिंपिक पदकविजेती लवलिना बोर्गोहेनने २०२३मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. ७५ किलो गटात तिला पदकासाठी फक्त एक सामना जिंकण्याची गरज आहे. या गटात आठच बॉक्सर आहेत. लवलिनाचा पहिला सामना दक्षिण कोरियाच्या सुयॉन सेओंगविरुद्ध होईल.

साक्षी चौधरी (५१ किलो) हिची पहिलीच लढत पॅरिस ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती फिलिपिन्सच्या आयरा विलागोस हिच्याशी होणार आहे. प्रीती पवार (५४ किलो) हिला पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली आहे. प्रिया घंघास (६० किलो) हिचा पहिला सामना दक्षिण कोरियाच्या ओह येओनजी हिच्याशी होईल. परवीन हुडा (६५ किलो) हिचा पहिला सामना ताजिकिस्तानच्या होजिमोव्हा हिच्याशी होईल.

पुरुष विभागातील सहभाग

जादुमनी सिंग (५५ किलो) पहिल्या फेरीत नेपाळच्या चंद्र थापाशी सामना करील. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सचिन सिवाच (६० किलो) याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. सुमीत कुंडू (७५ किलो) सोमवारी रिंगमध्ये उतरणारा पहिला भारतीय बॉक्सर असेल. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकिस्तानच्या २० वर्षीय विद्यमान विश्वविजेत्या टोरेखान साबिरखानशी होऊ शकतो. अंकुश पंघाल (८० किलो) याचा उपांत्य फेरीत विद्यमान ७५ किलो वजन गटातील विश्वविजेता फाझलिद्दीन एरकिनबोएव्हशी सामना होण्याची शक्यता आहे. नरेंद्र बेरवालला (९० पेक्षा जास्त किलो) पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *