
रशियाच्या डिझेल प्रकल्पावरील हल्ले युक्रेनने तातडीने थांबवावे, अशी विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेतून केली. या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारात इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण होत असून त्याचा मोठा फटका जगभरातील देशांना बसत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन या दोघांनीही एकमेकांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले न करण्याबाबत सहमी दर्शवल्याचे अमेरिकन अध्यक्षांनी सांगितले; पण या सामंजस्यामुळे जागतिक डिझेल बाजाराला लगेच दिलासा मिळू शकेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सध्या इराण युद्धाच्या संकटामुळे मध्यपूर्वेतील तेल शुद्धीकरण कारखाने आणि इंधनाची वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग अजूनही मोठ्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. जगातील इतर भागांतील तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने काम करीत असले तरी जागतिक पातळीवरील इंधनाचा राखीव साठा वेगाने घटत चालला आहे. या परिस्थितीवर जगातील सर्वात मोठी स्वतंत्र तेल व्यापारी संस्था असलेल्या विटोल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रसेल हार्डी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ९ सप्टेंबर रोजी ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना इंधनसाठ्यात होणारी घट रोखण्यासाठीही आपल्याकडे पुरेशी रिफायनिंग क्षमता नाही. त्यामुळे जगभरात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त साठ्यावर सातत्याने ताण येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनचा डिझेल संकटाशी काय संबंध?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या डिझेल टंचाईचा संबंध थेट युक्रेन युद्धाशी जोडला आहे. युक्रेनने रशियाच्या डिझेल प्रकल्पांवरील ड्रोन हल्ले तातडीने थांबवायला हवेत, कारण त्याचा मोठा फटका संपूर्ण जगाला बसत आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रशिया हा पारंपरिकरित्या जगातील डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार राहिला आहे. मात्र, युक्रेनकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील खनिज तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांत रशियातील अव्वल सहा डिझेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांचे काम सप्टेंबरपासून पूर्णपणे ठप्प आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियाने इंधन निर्यातीवर निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलची आणखीनच कमतरता भासत आहे. या टंचाईचा परिणाम खुद्द रशियावरही जाणवत असून तेथील डिझेलच्या किमतीतही अस्थिरता निर्माण झाली आहे. शुद्धीकरण क्षमता ढासळल्याने पेट्रोल पंपांवर विकल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेतही घट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



