Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, विरोधकांचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत करण्याची मागणी आता होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) अकोल्यामध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, या आढावा बैठकीमध्ये काही उपस्थित अधिकारी हे मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता विरोधकांनीदेखील याचा विरोध केला आहे.

नेमकं घडलं काय ?

आढावा बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत असताना काही अधिकारी मोबाईलचा वापर करताना दिसल्याचे समोर आले आहे. काही जण सोशल मीडियावर व्यस्त दिसले. तर काही जण व्हॉट्सॲपवर व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दुष्काळासारख्या गंभीर विषयावरील बैठकीत अधिकारी किती गांभीर्याने सहभागी झाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याआधी नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री आणि नेते काजू-बदाम खात असल्याचे दृश्य समोर आले होते. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

घडलेल्या प्रकाराची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेऊन आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस आमदार अमित झनक यांनीही बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांचे मोबाईलमध्ये व्यस्त राहणे निंदनीय असल्याचे म्हटले.

आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अमरावती विभागातील 8 जिल्हे आणि 56 तालुक्यांमधील परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. तसेच अमरावती विभागातील विविध पक्षांचे खासदार आणि आमदारही उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *