Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर IIT मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी; तीन दिवसांच्या आंदोलनात १८ मागण्या मान्य, संचालक राजीनामा देणार!

परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप झाल्याने आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याने शुक्रवारी आत्महत्या केली. यानंतर विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस कॉलेज कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन दिल्याने आयआयटी मुंबई प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या १८ कलमी मागण्या मान्य केल्या आहेत.

तसंच, संस्थेचे संचालक शिरीष केदारे हेही आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. या कराराचा तपशील सोमवारी एका खुल्या बैठकीत (ओपन हाऊस) विद्यार्थ्यांसमोर अधिकृतपणे ठेवला जाईल, त्यानंतर आंदोलक विद्यार्थी त्यांचे आंदोलन सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय घेतील.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे धरून बसलेले विद्यार्थी आणि आयआयटी-मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे व इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा तोडगा निघाला. संस्थेने या कराराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी या बैठकीच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये संचालक विद्यार्थ्यांच्या १८ कलमी मागण्यांच्या पत्रावर स्वाक्षरी करताना दिसले.

प्राध्यापकांच्या निलंबनाची मागणी आणि प्रक्रिया

साहिल परीक्षा देत असताना तिथे पर्यवेक्षक म्हणून काम करणारे प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना तातडीने निलंबित करावे, ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती. साहिलच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रा. दुल्ला यांचे नाव आहे. त्यांच्या निलंबनाच्या मागणीवर प्रा. केदारे लाइव्ह स्ट्रीममध्ये ‘आम्ही नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करू’, असं सांगताना दिसले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीची स्वतंत्र चौकशी व्हावी, ज्याचा अंतरिम अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत आणि अंतिम अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर केला जावा; संचालक, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता आणि एनर्जी सायन्स विभागाच्या प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत २२ सप्टेंबरपर्यंत खुली बैठक घेतली जावी; संस्थेने या घटनेबद्दलच्या आमच्या शंकांचं निरसन करावं आणि साहिलची बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी; प्राध्यापकांसाठी आचारसंहिता, शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य संवेदीकरण, समुपदेशन सेवांमध्ये सुधारणा आणि शिस्तभंग कारवाई समितीच्या प्रक्रियेत बदल; विद्यार्थ्यांचा ताणतणाव आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि बाहेरील तज्ज्ञांचा समावेश असलेला एक टास्क फॉर तयार करावा. या टास्क फोर्सने दर सेमिस्टरला अहवाल प्रसिद्ध करावा; २४ तास मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध असावेत, प्रशासकीय जबाबदारी वाढवावी आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वाढवावे. तसंच शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन; अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या.

फॅकल्टी फोरम प्राध्यापकांच्या पाठीशी

दुसरीकडे, विद्यार्थी प्रा. दुल्ला यांच्या निलंबनाची मागणी करत असतानाच, आयआयटी मुंबईच्या फॅकल्टी फोरमने (Faculty Forum) त्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. प्रा. दुल्ला हे केवळ त्यांचे पर्यवेक्षणाचे कर्तव्य बजावत होते आणि संस्थेच्या मंजूर कार्यपद्धतीचं पालन करत होते, असं फोरमने म्हटलं आहे. फॅकल्टी फोरमचे अध्यक्ष प्रा. राजकुमार एस. पंत यांच्या स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात साहिलच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, प्रा. दुल्ला यांच्या प्रतिमेला तडा जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की, शुक्रवारी परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने स्मार्टफोनचा वापर करून शैक्षणिक गैरप्रकार केल्याचे प्रा. दुल्ला यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियमानुसार या घटनेची माहिती संस्था प्रशासनाला दिली. ‘आमचे सहकारी प्रा. सूर्यनारायण दुल्ला जे केवळ आपले शैक्षणिक कर्तव्य पार पाडत होते आणि मंजूर प्रक्रियेचे पालन करत होते, त्यांची नाहक बदनामी होत असल्यामुळे आयआयटी मुंबईचे फॅकल्टी फोरम अत्यंत व्यथित आहे’, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *