Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

बायको जर ठीक नसेल, तर..; भरमंचावरून मोलकरीण म्हणत नितीन गडकरी खूप काही बोलून गेले

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय व्यासपीठ असो सांस्कृतिक व्यासपीठावरून नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असते.

काही दिवसांपूर्वी रेड लाइट एरियातून सर्वाधिक मते मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता थेट बायकोवर टिप्पणी केली आहे. ‘बायको जर ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्वान असो,तो राजकारणात,समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, असं विधान केंद्रीय नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी आमदार अनिल सोले यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गडकरींनी हजेरी लावली. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सोले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘अविरत कार्यरत : प्रा. अनिल सोले’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पुढे या कार्यक्रमात गडकरींनी उपस्थितांना संबोधित केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘माझे लग्न झाले त्यावेळी माझ्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा, यावर माझ्या बायकोने विचारले की, मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून? सामाजिक-राजकीय जीवन जगताना घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुलं चांगले निघाले, मुलांवर संस्कार चांगले झाले, मी काहीच पाहत नाही,मात्र त्यांनी पाहिले नसते तर चिंधड्याच झाल्या असत्या. एखाद्या व्यक्तीच्या यशामागे स्त्रीचे कर्तृत्व असते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्त्री कर्तृत्व अधोरेखित केले.

रेड लाइट एरियावर गडकरी काय म्हणाले होते?

काही दिवसांपू्र्वी गडकरींनी रेड लाइट एरियावर मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, मागील निवडणुकीत सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियातून अधिक मतदान झालं. सुशिक्षित लोकांनी 70 ते 75 टक्के मतदान केलं असेल. परंतु गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागातून 92 टक्के मतं मिळाली. आता याचा अर्थ संबंधित लोकांशी आपले संबंध आहेत, असा अर्थ काढू नये. या भागांत रस्ते आणि सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांनी मला मतदान केले, असं त्यांनी सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *