Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आपल्या वहिनी आहेत ना!’ नाशिकमधील अधिवेशनातून सुनेत्रा पवार यांच्या नव्या ब्रँडिंगचा नारळ फुटणार

नाशिक :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे पहिलेच अधिवेशन नाशिक येथे होणार आहे. रविवारी (दि. २७) भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात हे अधिवेशन होत असून, अधिवेशनात सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी खास ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ हे घोषवाक्य तयार केले असून, त्याचे मार्केटिंग केले जाणार आहे. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार या राजकारणात आल्या. त्या नवख्या असल्याने त्यांना ही जबाबदारी कितपत सांभाळता येईल, याविषयी अनेक स्तरांवरून प्रश्न उपस्थित केले जात होते.

तसेच पक्षात अंतर्गत धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळे काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत होते. वारंवार बैठका घेऊनही पक्षांतर्गत संघर्ष कमी होईना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस तसेच युवा नेते पार्थ पवार यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांबाबत काय भूमिका घेतली जाते, त्याचा अंदाज या अधिवेशनातून येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे भविष्यातील पक्षाच्या दिशा निश्चितीच्या दृष्टीने हे अधिवेशन राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

नवीन घोषवाक्यातूनही ब्रँडिंग

अजित पवार हयात असताना ‘एकच वादा, अजितदादा!’ ही घोषणा लोकप्रिय झाली होती. राष्ट्रवादीच्या सगळ्या जाहीर कार्यक्रमांत ही घोषणा कार्यकर्त्यांच्या तोंडी असे आणि बॅनरवरही अशी घोषणा लिहिली जात असे. मात्र आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बालेकिल्ला म्हणून निवड

विधानसभा निवडणुकीत अजितदादांना नाशिक जिल्ह्याने भरभरून साथ दिली. त्यामुळे पक्षाचा नाशिक हा बालेकिल्ला म्हटले जात होते. म्हणूनच याच बालेकिल्ल्यावर पक्षाचे अधिवेशन घेऊन पक्षाने पुन्हा नव्याने रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *