ST प्रवाशांसाठी महत्त्वाचे! NCMC कार्ड नियमांत बदल, बायोमेट्रिक त्रुटीसाठी आता आधार OTPचाही पर्याय, आजपासून नोंदणी

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या प्रवाशांना आता आधार ‘ओटीपीवर’ही ‘एनसीएमसी’ कार्ड घेता येणार आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी महामंडळाने अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ओटीपीवर कार्डनोंदणी करण्याची मुभा दिली आहे. आज, सोमवार २१ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. यामुळे बायोमेट्रिकअभावी कार्डनोंदणी रखडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एसटी प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ७५ वर्षांवरील अर्थात अमृत ज्येष्ठ नागरिक अशा सवलतधारक प्रवाशांना ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणी आणि वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे एसटीच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी कार्डमधूनच तिकीट घेण्याची सक्ती करण्याचे नियोजन महामंडळाचे आहे.
कार्डसाठी बायोमेट्रिक करताना हातांच्या बोटांचे ठसे जुळवताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. आता बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधारकार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरील ‘ओटीपी’च्या मदतीने कार्ड नोंदणी पूर्ण करता येईल. यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय कार्ड वितरित करणे शक्य होणार आहे.
आजपासून नोंदणी
आधार ओटीपी आणि कार्डची पुनर्नोदणी करण्याची सुविधा आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. १९ सप्टेंबरपर्यंत ‘एनसीएमसी’ कार्डसाठी नोंदणी केलेल्या सर्व प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या सवलतीस पात्र प्रवाशांना क्यूआर कोड असलेली पावती दिली जात आहे. कोणत्याही कारणामुळे कार्ड न मिळाल्यास अशा प्रवाशांना पावती दाखवून सवलतीच्या दरात तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत वैध राहणार आहे. या कालावधीत संबंधित केंद्रातून कार्ड घेऊन ते ‘टॉप अप’ करून कार्यरत करणे आवश्यक आहे, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.



