
पनवेल आणि कर्जत मार्गावरून लवकरच लोकल सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. दिवाळीत या सेवांचे
लोकार्पण करण्याच्या दृष्टीने रेल्वेने तयारी सुरू केली आहे. सीआरएसच्या मंजुरीनंतर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होणार आहे.
कर्जत आणि पनवेलदरम्यानचारेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि थेट करण्यासाठी सुरू असलेल्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. २९.६ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गिकेचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून दिवाळीच्या मुहूर्तावर लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वेची तयारी सुरू आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) मार्गिकेची तपासणी आणि मंजुरी घेणे आवश्यक आहे.
पनवेल ते कर्जत मार्गावर ५ स्थानके असतील
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) २,७८२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गामुळे पनवेल-कर्जतदरम्यान पर्यायी उपनगरी मार्ग उपलब्ध होणार असून नवी मुंबईसह कर्जत आणि रायगड परिसरातील जोडणी अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके आहेत. मोहापे स्थानकाचे नाव बदलून पोयंजे करण्यात आले आहे.
स्थानके आणि सिग्नल यंत्रणा अंतिम टप्प्यात
नवीन पनवेल स्थानकाची इमारत कार्यान्वित झाली असून चिखले आणि पोयंजे स्थानकांच्या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. चौक आणि कर्जत स्थानकांवर फलाट, प्रवासी परिसर, छत, लिफ्ट, जिने आणि इतर सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सिग्नल यंत्रणेत पोयंजे आणि चौक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी कारखाना स्वीकृती चाचणी (एफएटी) आणि प्रत्यक्ष ठिकाणी स्वीकृती चाचणी (सॅट) पूर्ण झाली आहे. दूरसंचार आणि इतर यंत्रणांची कामे सुरू आहेत. खासगी, सरकारी आणि वनजमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
पूल, बोगदे आणि उड्डाणपूल पूर्ण
पनवेल कर्जत दुपदरीकरण प्रकल्पातील बहुतांश बांधकामे पूर्ण झाली आहेत. सर्व प्रमुख आणि लहान पूल, पाच रस्ते उड्डाणपूल (आरओबी) आणि १६ रस्ते भुयारी मार्ग (आरयूबी) पूर्ण झाले आहेत. मार्गिकेवरील तीनही बोगद्यांचे खोदकाम आणि अंतिम अस्तरीकरणही पूर्ण झाले आहे. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दोन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले असून त्यावर रुळ जोडणीचे काम सुरू आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातून रुळ जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे.
डोंगरातून धावणार लोकल
या मार्गिकेवर तीन बोगदे असून त्यांची एकूण लांबी ३.१६४ किलोमीटर आहे. त्यापैकी वावर्ले बोगदा २.६२५ किलोमीटर लांबीचा असून तो मुंबई उपनगरी नेटवर्कमधील सर्वांत लांब बोगदा आहे. लोकल सुरू झाल्यानंतर पनवेल-कर्जत प्रवास ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे. प्रकल्प डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यापूर्वी उर्वरित तांत्रिक कामे आणि सीआरएसची सुरक्षा तपासणी व मंजुरी घेणे आवश्यक आहे.
‘असा’ आहे नवा मार्ग
– लांबी : २९.६ किमी – मार्ग : दुहेरी – प्रकल्प खर्च : २,७८२ कोटी – प्रगती : ९९ टक्के – स्थानके : पनवेल, चिखले, पोयंजे, चौक, कर्जत – बोगदे : ३ – बोगद्यांची एकूण लांबी : ३.१६४ किमी – वावर्ले बोगदा : २.६२५ किमी – रस्ते उड्डाणपूल : ५ – रस्ते भुयारी मार्ग : १६ – अपेक्षित प्रवास वेळ : ३५ ते ४० मिनिटे – प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य : डिसेंबर २०२६ – पुढील टप्पा : सीआरएस तपासणी आणि मंजुरी



