माझी पुढची पोस्टिंग ही..”, एफडीएमधून बदलीची चर्चा, तुकाराम मुंढेंनी कोणताही आडपडदा न ठेवता सगळं सांगितलं

मुंबई : आयएएस अधिकारी तुकराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धुरा हाती घेतल्यानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या आयएएस अधिकारी पदाच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जातात.
मात्र, त्याच वेळी त्यांची बदली देखील सातत्याने होत असते. वारंवार होणाऱ्या बदलीमुळे तुकाराम मुंढे हे चर्चेत असतात. आता पुढील बदली कोणत्या खात्यात आवडेल यावर तुकाराम मुंढे यांनी थेट भाष्य केले.
एफडीएकडून मागील काही महिन्यात धडाकेबाज कारवाई करण्यात आल्या आहेत अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेतच, शिवाय नागरिकांमध्येही काही प्रमाणात जागरुकता आली आहे. त्यासोबत आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा पुन्हा एकदा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या चर्चांवर अखेर तुकाराम मुंढे यांनी स्वतः मौन सोडले. ‘न्यूज १८ मराठी’ च्या बाप्पाचे तुकाराम मुंढे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ‘न्यूज १८ मराठी’ सोबत संवाद साधताना त्यांनी संभाव्य बदलीवर भाष्य केले.
दिल्लीत जाणार?
यावेळी त्यांना राज्याबाहेर किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करण्याबाबत विचारले असता, त्यांनी आपल्या कार्यशैलीचे रहस्य सांगताना स्पष्ट केले, “मी भविष्याची उगाच चिंता करत बसत नाही. सध्या हातात जी जबाबदारी आहे, ती सर्वोत्तम पद्धतीने कशी पूर्ण करता येईल यावरच माझा पूर्ण रोख असतो.” भविष्याचा अतिविचार करण्यापेक्षा प्रत्येकाने वर्तमानात जगले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.



