उपजिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही, नाशिकमध्ये तरुणाला महसूल सहायक पदाचे बनावट नियुक्तिपत्र देत फसवणूक

नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुभमेळ्याचा काळ असून बनावट वर्क ऑर्डरसह भरतीच्या बनावट जाहिरातीचा प्रकार यापूर्वी उघड झाला आहे. आता बोगस नियुक्तीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाला मालेगाव तहसील कार्यालयात महसूल सहायक पदावर नियुक्त करण्यात आल्याचे पाच पानांचे बनावट नियुक्त पत्र देण्यात आले. यामागे आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश होता. त्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल व सामान्य प्रशासन विभाग तसेच मंत्रालय, मुंबई आणि महसूल व वन विभागाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून हे बोगस नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेत सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून नोकरी करत असलेले प्रदीप श्याम मोठे यांनी प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात भामट्याविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी नाशिक, महसूल व सामान्य प्रशासन विभाग (मंत्रालय, मुंबई) तसेच महसूल व वन विभागाचे हुबेहूब बनावट शिक्के कुणीतरी अज्ञात इसमाने तयार केले. या बनावट शिक्क्यांचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून तन्मय देसले (रा. आर्च संकुल, एन एस वन, सिडको, छत्रपती संभाजीनगर) या तरुणाला आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने बनावट नियुक्तीपत्र तयार करुन देण्यात आले.
हे पत्र टपालाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावरील अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का बनावट असल्याचे लक्षात येताच सहाय्यक महसूल अधिकारी प्रदीप मोठे यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणात, तन्मय देसले याला खुल्या प्रवर्गातून मालेगाव येथील तहसील कार्यालयात ‘महसूल सहायक’ या पदावर निवड झाल्याचे भासवून तब्बल पाच पानांचे एक बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, या पत्रावर सध्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक-२ म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र वाघ यांची खोटी व बनावट सही मारण्यात आली. या माध्यमातून शासनाची आणि महसूल विभागाची फसवणूक करण्यात आली असून उमेदवाराची दिशाभूल करण्यात आली.



