Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

आता घर बसल्या बुकिंग, शुक्रवारपासून ‘एफएफएस’ ॲपद्वारे रासायनिक खतांची विक्री. खरीप हंगाम संपल्यानंतर कृषी विभागाला आली जाग

परभणी: खरिपाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून कधी चढ्या दराने तर कधी दुकानदाराने सक्ती केलेल्या आणखी कुठल्यातरी खतासोबत आपल्याला हव्या त्या खताची खरेदी शेतकऱ्यांनी केली. आता खरीप हंगामानंतर प्रशासनाला जाग आली असून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने करता यावी, यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित केली आहे.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (दि.२५)पासून खत विक्रीची अंमलबजावणी केवळ मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८५० खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवून पूर्व-बुकिंग करता येणार आहे असा दावा कृषी विभागाने केला आहे.

शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकाच्या आधारे खताची शिफारस केलेली मात्रा अँपमध्ये उपलब्ध होईल. त्यानुसार आवश्यक खत आणि जवळचा अधिकृत विक्रेता निवडल्यानंतर अर्ज सादर करता येईल. बुकिंग यशस्वी झाल्यानंतर मोबाईलवर युनिक क्यूआर कोड व टोकन क्रमांक प्राप्त होईल. शेतकऱ्याने अधिकृत खत विक्रेत्याकडे मोबाईलवरील क्यू आर कोड दाखविल्यानंतर इ – पॉस मशीनद्वारे पावतीसह खत प्राप्त करता येईल. प्राप्त क्यू आर कोडच्या आधारे तीन दिवसांच्या आत खत खरेदी करता येणार आहे. या प्रणालीमुळे कृत्रिम तुटवड्याला आळा बसणार असून, युरिया, डीएपी यांसारख्या आवश्यक खतांचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा रोखण्यास मदत होईल. जमिनीचे क्षेत्रफळ व पिकाच्या गरजेनुसार खताच्या शिफारस केलेल्या मात्रेची माहिती मिळेल. तसेच शेतकऱ्यांना मोबाईलवरून घरबसल्या खताचे बुकिंग करता येईल. या अँपमुळे बुकिंग, विक्रेता आणि खत वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल असा दावा प्रशासनाने केला आहे. या प्रणालीचा अवलंब करून या पारदर्शक व सुलभ प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *