पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापालिका भवनाचा खर्च वाढणार; २८६ कोटींच्या प्रकल्पावर आणखी कोट्यवधींचा भार

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे महापालिका भवन चिंचवड येथील सायन्स पार्कच्या शेजारी उभारण्यात येत आहे. इमारतीच्या बांधकामांचा खर्च 286 कोटी रुपये अपेक्षित होता. इमारतीची इतर कामे, सुशोभिकरण आदीवर आणखी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यासाठी अतिरिक्त खर्च आहे. त्यामुळे नवीन महापालिका भवनाचा खर्च वाढतच चालला आहे.
सायन्स पार्क शेजारी महापालिकेची एकूण 33.86 एकर जागा आहे. त्यापैकी 8.65 एकर जागेत नवीन महापालिका भवन उभारण्यात येत आहे. तेथे 18 मजली दोन आणि 6 मजली दोन अशा चार पर्यावरणपूरक इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम जानेवारी 2023 ला सुरू झाले असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. कामाची तीन वर्षांची मुदत जुलै 2025 ला संपली आहे. अतिरिक्त एका वर्षाची मुदत संपूनही काम अजूनही सुरूच आहे.
मूळ निविदेचे काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या आवारातील मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी), पाण्याची टाकी, ड्रेनेजलाईन व्यवस्था आणि प्रत्येक विभागात फर्निचरचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन निविदा काढण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण 562 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, महापालिका भवनाच्या आवारात दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात येत असून, तेथे अजितसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्याचा खर्चही मोठा असणार आहे. परिणामी, महापालिका भवनाचा खर्च वाढत असून, तो साडेपाच कोटींच्या पुढे जाण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका भवनाची इमारत 40 वर्षे जुनी
सध्याच्या पिंपरी येथील महापालिका भवनाच्या इमारतीचे उद्घाटन 13 मार्च 1987 ला तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते झाले होते. त्या इमारतीस सुमारे 40 वर्ष झाली आहेत. या कालावधीत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, ती 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहराला लागून असलेला काही परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. त्या भाग तसेच, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास महापालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरविण्याचा ताण वाढत आहे. त्यासाठी नवीन भव्य इमारती उभारण्यात येत असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
महापालिका भवनाच्या आवारात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा
नवीन महापालिका भवनाच्या आवारात दर्शनी भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा सत्ताधारी भाजपाने केली आहे. अद्याप त्याचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही. पुतळ्याची उंची 22 मीटर इतकी असणार आहे. त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभिकरण तसेच, कारंजे असणार आहेत. त्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतिम केला जाणार आहे.
नवीन महापालिका भवनास रस्ते, मेट्रो, बीआरटी, ई-आरटीएस कनेक्टिव्हीटी
या ठिकाणी 6 ते 18 मजल्यांच्या चार इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला 3 तळघरे (बेसमेंट) आहे. येथे नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग्रंथालय, क्लिनिक, वाचनालय, प्रदर्शन हॉल, संग्रहालय, बहुउद्देशीय हॉल, भव्य सभागृह, पत्रकार कक्ष असणार आहे. नगरसेवक संख्या वाढ लक्षात घेऊन भव्य सभागृह व दालने असतील. चारचाकी 479 आणि दुचाकी 2 हजार 713 वाहने पार्क करता येईल, असे वाहनतळ असणार आहे. एकूण 16 लिफ्ट असतील. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने रस्ते, मेट्रो, बीआरटीएस, ई-आरटीएस सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हीटी असणार आहे. ती इमारत नागरिकांसह, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचार्यांना सोईस्कर ठरणार आहे. एकाच इमारतीमध्ये महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी बसू शकतील, अशी क्षमता आहे. महापालिकेचे सर्व विभागांचे कामकाज येथून चालणार असल्याने सर्व विभागाचे काम एका छताखाली येणार आहेत. विविध विभागात तब्बल 2 हजार 689 अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे.
मुदतीमध्ये काम न केल्याने ठेकेदारांवर कारवाई करावी
ठेकेदाराची तीन वर्षांची मुदत संपून एक वर्ष लोटला आहे. तरीही काम अद्याप संपलेले नाही. वेगवेगळी कारणे पुढे करून या प्रकल्पाचा खर्च वाढला जात आहे. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, स्थापत्य विभागाच्या दोषी अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होत आहे. तेथे काम करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षेकडे लक्षे दिले जात नाही. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सांगितले.
वेगवेगळ्या निविदा काढल्याने खर्च वाढल्याचे दिसत आहे
इमारतीचे काम वेगात सुरू आहे. चारही इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. विद्युतविषयक कामेही केली जातील. इमारतीच्या आवारातील कामे, एसटीपी, पाण्याची टाकी आणि फर्निचरचे कामासाठी स्वतंत्र दोन निविदा काढण्यात येणार आहेत. त्यासाठी खर्च वाढलेला दिसत आहे. कामानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.



