Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळ व अस्‍वच्‍छतेबाबत पुण्यासह विभागातील इतर जिल्ह्यांत कारवाई केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार प्रमुख हॉटेल व रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले असून, सुमारे एक लाख ७२ हजार रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

एफडीए’ने नियमांची पायमल्‍ली करणाऱ्या अन्‍न पदार्थ व्‍यावसायिकांवर (हॉटेल, बेकरी, रेस्‍टॉरंट) कारवाई सुरू केली आहे.

बहुतांश हॉटेलमध्‍ये अस्‍वच्‍छता असल्‍याचे दिसून येत आहे. यामध्‍ये स्वयंपाकघरात अन्‍न व्यवस्थित तापमानावर न साठवणे, झुरळांचा वावर, कचरा, शिळे पदार्थ यांचा वापर तर काही ठिकाणी वॉशरूम देखील स्‍वयंपाकगृहात आढळली आहेत. सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये विनालेबल मनुका, संशयास्पद लाडू, पनीर, तूप आणि मिठाई जप्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

पावणेदोन लाखाचा साठा जप्त पुणे विभागात एक लाख ७२ हजार रुपयांचा संशयास्पद व नियमबाह्य अन्नसाठा जप्त केला आहे. यामध्‍ये सातारा जिल्ह्यातील सुरूर (ता. वाई) येथील मे. मानस फॅमिली रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केला. रेस्टॉरंटने प्रशासनाने दिलेल्या सुधारणा नोटिशीचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली. सांगलीतील हरीपूर येथे विनापरवाना सुरू असलेल्या मौर्या नमकीन या पेढीवर छापा टाकून ५३ हजार ६०० रुपयांचे २६८ किलो ‘चिली मिली’ नमकीन जप्त केले असून, त्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात या ठिकाणी कारवाई पाषाणमधील मे. आर. पी. हॉस्पिटॅलिटीज (रंगला पंजाब) आणि कर्वेनगरमधील मे. मनीषा डोसा सेंटर या दोन ठिकाणी स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच व्यवसायातील बदलांची माहिती न दिल्याने या दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. पुणे जिल्ह्यातील डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथील मे. हॉटेल न्यू नित्यानंद अँड आइस्क्रीमचा परवाना निलंबित करण्यात आला, तर कोंढव्यातील मे. पारस केमिकल्स इंडस्ट्रीजमधून ६१ हजार ८०० रुपयांचा १६४.८ किलो ग्लुकोज-डीचा साठा जप्त केला. हा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *