आदित्य ठाकरेंवर दिशा सालियनच्या वडिलांचे गंभीर आरोप, ठाकरेंच्या शिलेदाराचा राणे पिता-पुत्रांवर सवाल; ‘मग टॉवर लोकेशन कशाला मागताय?’

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंचे नावदेखील यात आहे.
यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सतत टीका करणारे मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे ठाकरेंच्या शिलेदाराच्या निशाण्यावर आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी दिशा सालियनच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वकिलाने जी कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत, त्यावरून राणे पिता-पुत्रांवर सवाल करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सतीश सालियन यांच्या वकिलाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांत मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे नाव आहे. या प्रकरणात राणे पिता-पुत्र प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी चित्रे यांनी सात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी राणे पिता-पुत्र प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते? आत्महत्या होताना किंवा बलात्कार होताना त्यांनी रोखलं का नाही?
महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा, न्यायालयीन कार्यवाहीत सादर करण्यात आलेला दस्तऐवज पाहा. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजीच्या Exhibit ‘A’ मधील पान क्रमांक २३३, मुद्दा क्रमांक २ मध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे : “कु. दिशा सालियन ह्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याबाबतचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व इतर अनेक लोकांनी केले आहेत.”
याचा सरळ-सरळ अर्थ होतो की, त्या सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे प्रत्यक्षदर्शी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आहेत. तर नितेश राणे सतत म्हणत असतात की, त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांचे टॉवर लोकेशन आहे. जर त्यांच्याकडे लोकेशन असेल, तर न्यायालयाकडे का मागणी करता?



