
20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांनिमित्त जपानमधील आयची-नागोया येथे रंग, प्रकाश, संगीत आणि क्रीडा उत्साहाच्या दिमाखदार सोहळय़ात अवघा आशिया एकचि झाल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या भव्य उद्घाटन सोहळय़ात जपानचे सम्राट नारुहितो यांनी स्पर्धा अधिकृतपणे सुरू झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आशियातील क्रीडा महासंग्रामाला सुरुवात झाली.
हिंदुस्थानची एण्ट्री ठरली केंद्रबिंदू!
ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी तिरंगा खांद्यावर घेत हिंदुस्थानी पथकाचे नेतृत्व केले. दोघांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी पथकाने स्टेडियममध्ये प्रवेश करताच वातावरणात देशभक्तीचा जल्लोष निर्माण झाला. मनू भाकरसोबत आधी गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूर यांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती, मात्र अधिकृत समारंभाच्या किटशी संबंधित अडचणींमुळे शेवटच्या क्षणी तूर यांच्या जागी पवन सेहरावत यांची निवड करण्यात आली.
जपानी संस्कृतीचे दर्शन
उद्घाटन सोहळय़ात जपानी संस्कृतीची झलक दाखविणाऱया पारंपरिक नृत्य आणि संगीताने सुरुवात झाली. कलाकारांनी एकत्रित येऊन वेलकमची आकर्षक रचना साकारत उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर 45 देश व प्रदेशांच्या पथकांनी राष्ट्रध्वजासह संचलन केले. हार्ट बीट आयची- नागोया या संकल्पनेभोवती सोहळय़ाची मांडणी करण्यात आली. आशियाच्या विविधतेतून एकता, क्रीडेतून मैत्री आणि स्पर्धेतून परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा सोहळा रंगला. शेवटी आशियाई क्रीडा ज्योत प्रज्वलित होताच स्टेडियममध्ये जल्लोषाचा कडेलोट झाला.
आशियाची क्रीडा ताकद एका मैदानात
उद्घाटन सोहळय़ात 45 देश आणि प्रदेशांच्या पथकांनी राष्ट्रध्वजासह संचलन केले. या संचलनाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यापकतेचे दर्शन घडवले. उत्तर कोरियासह विविध देशांची पथके मैदानात दाखल झाली आणि प्रत्येक पथकाने आपापल्या देशाच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. आशियाई क्रीडा स्पर्धा केवळ पदकांसाठीची स्पर्धा नसून विविध देशांतील खेळाडूंना एका व्यासपीठावर आणणारा मोठा क्रीडा सोहळा आहे. संचलनादरम्यान भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय विविधतेतून क्रीडेमुळे निर्माण होणाऱया एकतेचे चित्र स्पष्ट झाले.
नागोयाची ओळख जगासमोर
उद्घाटन सोहळय़ात आयची-नागोया प्रदेशाच्या इतिहासापासून आधुनिक औद्योगिक सामर्थ्यापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला. नागोया किल्ल्याच्या विशाल प्रतिकृतीसह पारंपरिक जपानी संस्कृतीचे दर्शन घडवले. कबुकी कलाकारांनी जपानी कलावैभवाची झलक दाखवली. औद्योगिक क्षेत्रातील ओळख दाखवण्यासाठी व्यावसायिक पोशाखातील कलाकार, आधुनिक मोबिलिटी वाहने आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानावर आधारित दृश्यांचा वापर करण्यात आला.
43 खेळ, हजारो स्वप्ने
उद्घाटनानंतर आता लक्ष थेट मैदानातील कामगिरीकडे वळले आहे. आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारांसह सुमारे 11 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. पारंपरिक ऑलिम्पिक खेळांसोबत आशियाई क्रीडा संस्कृतीशी जोडलेले कबड्डी आणि सेपाक टकरॉ यांसारखे खेळही स्पर्धेचा भाग आहेत. ई-स्पोर्ट्सचा समावेश पुन्हा करण्यात आला आहे. त्याचबरोबर टेगबॉल आणि व्हर्च्युअल तायक्वांदो या प्रकारांना आशियाई स्पर्धेत नव्या स्वरूपात स्थान मिळाले आहे.



