Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

भारत फोर्ज, प्रॅट अँड व्हिटनीकडून स्वदेशी HALE UAV साठी टर्बोप्रॉप इंजिनच्या एकत्रीकरणाचे मूल्यांकन

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या हाय-अल्टिट्यूड, लाँग-एंड्युरन्स (HALE) मानवरहित हवाई वाहनासाठी (UAV) प्रगत टर्बोप्रॉप इंजिनच्या एकत्रीकरणाचे मूल्यांकन भारत फोर्ज लिमिटेड आणि आरटीएक्सच्या प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा या कंपन्या संयुक्तपणे करणार आहेत. या सहकार्यामुळे केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत स्वदेशी मानवरहित हवाई प्रणाली विकसित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा इंजिनची सुसंगतता, कार्यक्षमता आणि बसविण्यासंबंधीच्या आवश्यकतांचे मूल्यांकन करणार आहे. तर भारत फोर्ज इंजिन आणि विमानाच्या सांगाड्याच्या एकत्रीकरणासाठी आवश्यक रचना आणि प्रणाली जोडणीच्या कामाचे नेतृत्व करणार आहे.

भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले की, भारताच्या स्वदेशी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षमतांना बळ देण्यासाठी हे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिन तंत्रज्ञानास भारत फोर्जच्या अभियांत्रिकी आणि प्रणाली एकत्रीकरण क्षमतेची जोड मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रॅट अँड व्हिटनीचे उपाध्यक्ष आणि भारत प्रमुख आशिष सराफ यांनीही या सहकार्यामुळे भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील प्रयत्नांना पाठिंबा मिळणार असल्याचे सांगितले. टर्बोप्रॉप इंजिनची आव्हानात्मक परिस्थितीत विश्वासार्ह कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. HALE UAV चा वापर जमीन आणि सागरी क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ देखरेख, गुप्तचर आणि टेहळणीसाठी केला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *