निठारी हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या सुरेंद्र कोळीची आत्महत्या

निठारी साखळी हत्याकांड प्रकरणात २०२५ मध्ये निर्दोष सुटलेला सुरेंद्र कोळी हरिद्वारमध्ये मृत आढळला आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुरेंद्र कोळी भूपतवाला परिसरात एक चहाचे दुकान चालतवत होता.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी अद्याप कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
हरिद्वारचे शहर पोलीस आयुक्त शिशुपाल सिंह नेगी यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, हरिद्वारच्या सप्रिशी परीसरातून आम्ही सदर व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत व्यक्तीचे नाव सुरेंद्र कोळी असून प्राथमिक अंदाजानुसार आत्महत्येमुळे मृत्यू झाला असल्याचे दिसते. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. अंतिम अहवाल आल्यानंतर नेमके कारण सांगता येईल.
२००६ सालचे निठारी हत्याकांड काय होते?
नोएडाच्या सेक्टर ३१ मध्ये २००५ आणि २००६ साली घडलेल्या निठारी गावातील मुले आणि महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हे हत्याकांड उघड झाले होते. डिसेंबर २००६ साली मोहिंदर सिंग पंढेर यांच्या मालकीच्या घरामागील गटारात आणि मोकळ्या जमिनीच्या जागेत मानवी सांगाड्याचे अवशेष आढळून आले होते. सुरेंद्र कोळी पंढेरच्या घरात नोकर म्हणून काम करत होता.
मानवी सांगाड्याचे अवशेष आढळून आल्यानंतर पोलिसांनी कोळी आणि पंढेरला २९ डिसेंबर २००६ रोजी अटक केली. जानेवारी २००७ मध्ये आणखी सांगाडे आणि कपडे आढळून आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. सीबीआयने एकूण १६ प्रकरणांमध्ये आरोप दाखल केले. २००९ मध्ये सत्र न्यायालयाने कोळी आणि पंढेर यांना बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये आरोपीच्या कबुलीजबाबवर अवलंबून खटला पुढे नेला. २००९ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोळीला दोषी मानत मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली, मात्र पुराव्याअभावी पंढेरची सुटका करण्यात आली.
२०११ साली सुरेंद्र कोळीने शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला सिरियल किलर म्हणत त्याची याचिका फेटाळून लावली. तसेच हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले.
मात्र २०२३ साली, अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोळीची १२ प्रकरणातून मुक्तता केली. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातही अपील केले. मात्र जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावल्यामुळे सुरेंद्र कोळीची निर्दोष मुक्तता झाली.



