
अंधेरीतील नामांकित वैद्यकीय उपकरण विक्रेत्याच्या कार्यालयावर बनावट आयकर धाड टाकून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयकर विभागाच्या दोन निरीक्षकांसह आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या १० झाली असून, आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
सूरज महावीरप्रसाद मिश्रा (५७), सुनील गोरे (५९), जितू उर्फ जितेंद्र मोरे (५२) आणि अशोक विठोबा शिंदे (५७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मिश्रा आणि गोरे हे आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर मोरे आणि शिंदे यांना तुरुंगातून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी संतोष उदय खोपटकर, प्रेम सबनानी, प्रज्ञा माईन, रेश्मा वारंग, सबिना शेख आणि विनय रमेश मोरे या सहा जणांना अटक झाली होती.
तक्रारदार राजकुमार कन्डासमी यांचा अंधेरी पूर्व, चकाला येथील सहार कार्गो इस्टेटमध्ये वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय आहे. १७ जुलै रोजी त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड पडल्याचे सांगत कर्मचाऱ्याला फोन करण्यात आला. कार्यालयातील मोबाइल जप्त करून सीसीटीव्ही बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कन्डासमी यांना कार्यालयात न आल्यास घरातून उचलून आणण्याची धमकी देण्यात आली.
कन्डासमी पत्नीसह कार्यालयाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तोतया अधिकाऱ्यांनी त्यांना बनावट ओळखपत्र दाखवून ताब्यात घेतले आणि कार्यालयात नेले. तेथे पाच पुरुष व तीन महिला उपस्थित होते. त्यांनी आयकर व गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवले. बनावट सर्च वॉरंट दाखवून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. कारवाई टाळण्यासाठी पैसे न दिल्यास १ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड होईल, अशी धमकी देण्यात आली. संशय आल्याने कन्डासमी यांनी सीए आणि आयकर विभागाकडे चौकशी केली. अधिकृत धाड झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे.



