Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातील प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विकासकामे, आरोग्यसेवा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले.

रुग्णालयातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या परिषद दालनात बैठक घेण्यात आली.

या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता टेकाळे, भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नसीम पटेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

बैठकीत दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षण केंद्राची जागा लवकरात लवकर दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी वर्ग करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालय परिसरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अग्निशमन विभागामार्फत सातत्याने प्रात्यक्षिक सराव आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.

माता-बाल व क्रिटिकल केअर रुग्णालयाच्या कामांना गती

महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या माता-बाल रुग्णालय तसेच क्रिटिकल केअर रुग्णालयाच्या कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.

या कामांसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना देण्यात आल्या.

रुग्णालय परिसरातील स्वच्छतेवरही भर

रुग्णालय परिसरातील कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा. तसेच परिसरात फिरणाऱ्या मोकाट डुकरांचा आणि कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

रुग्णालयाला २४ तास पाणीपुरवठा करण्यासोबतच वसतिगृह, महाविद्यालय आणि इतर विभागांसाठी स्वतंत्र पाणी मीटर बसवून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी बैठकीत दिली.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील विविध विकासकामांची तसेच अग्निशमन यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *