Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

IIT-IIM चे पेपर फुटत नाहीत, मग महाराष्ट्रातच का? एमपीएससीच्या पेपरफुटीवर Supriya Sule यांचा थेट सवाल

Supriya Sule महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले आहे. MPSCच्या परीक्षा, पेपरफुटी आणि यंत्रणेतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून सरकारने त्यांच्याशी थेट चर्चा करणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि परीक्षा यंत्रणेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचेही सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था मिळणे आवश्यक आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात महागाई, भ्रष्टाचार, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखी अनेक आव्हाने असल्याचे सुळे म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या मते, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करताना सुळे यांनी पूर्वीच्या काळातील कर्जमाफीचाही संदर्भ दिला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी केली होती, असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारने व्यापक निर्णय घ्यावा, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, MPSCच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाबाबत सुळे यांनी गंभीर अनुभव सांगितला. एका महिलेने रात्री फोन करून परीक्षा आणि परिस्थितीमुळे आपण निराश झाल्याचे सांगितले. तिने आत्महत्येचा विचार व्यक्त केल्याने आपण नागरिक म्हणून पोलिसांना तिच्या संदेशाचे स्क्रीनशॉट पाठवले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधून तिला समजावल्याचे सकाळी कळविल्याचे सुळे यांनी सांगितले.

विद्यार्थी प्रचंड मेहनत घेऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर परिणाम होणार नाही आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम राहील, याची जबाबदारी यंत्रणेने घ्यावी, असे सुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी सुळे यांनी लोकशाहीतील संवाद आणि मतभिन्नतेबाबतही भूमिका मांडली. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून, इतरांच्या भावनांचाही सन्मान केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आगामी बैठकीत नवीन प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रश्नावर बोलण्यास सुळे यांनी नकार दिला. राऊत हे राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठे नेते असल्याचे सांगत, या विषयावर सरकारला प्रश्न विचारावेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. आपल्या पूर्वीच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुटखाबंदीच्या निर्णयाचा संदर्भ देत सुळे यांनी सरकारच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडून इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सरकारने महत्त्वाच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, MPSCच्या परीक्षांबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारने विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. “IIT आणि IIMच्या परीक्षा होतात, मग त्यांचे पेपर का फुटत नाहीत?” असा थेट सवाल करत त्यांनी महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेत AIसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *