Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यातील ऊस उपलब्धतेचा फेरआढावा घ्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे कृषी विभागाला आदेश

मुंबई : गळीत हंगामाच्या आढावा बैठकीत कृषी विभाग आणि मिटकॉनने उसाच्या उपलब्धते बाबत सादर केलेला अहवाल वस्तुस्थितीजन्य वाटत नाही. एल- निनो, अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर फेर आढावा घेऊन वस्तुस्थितीजन्य अहवाल तातडीने सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

यंदाच्या गळीत हंगामासाठी तोडणी योग्य ऊस १५.४८ लाख हेक्टरवर असून, सरासरी ८० टन प्रति हेक्टरी ऊस उत्पादन निघेल. त्यातून गाळपासाठी १२३८.४० लाख टन ऊस उपलब्ध होईल. साखर उतारा सरासरी ९.७३ टक्के मिळेल. इथेनॉलसाठी १५ लाख टन साखरेचा उपयोग होऊन, निव्वळ साखर उत्पादन ९६.४५ लाख टन होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. पुण्यातील मिटकॉन या सल्लागार संस्थेनेही असाच अंदाज व्यक्त केला आहे.

कृषी विभाग आणि मिटकॉनचा अहवालावर साखर कारखानदार, खासगी आणि सहकारी कारखानदारांच्या संघटनांसह मुख्यमंत्र्यांनी शंका उपस्थितीत केली. जून महिन्यात पाऊस पडला नाही, जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील ऊस पाण्याअभावी वाळून चालला आहे. सिंचनासाठीच्या पाण्याचीही कमतरता जाणवत आहे, अशा स्थितीत ऊस किती हेक्टरवर आहे, त्यापेक्षा उसाच्या वाढीचा, उसातील साखरेच्या प्रमाणाचा फेर आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी निधी कपातीची वेळ ?

गतवर्षी राज्यात आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीसाठी गाळप होणाऱ्या उसावर प्रतिटन पाच रुपये पूरग्रस्त निधीसाठी कपात केले होते. त्यापोटी ४०.७६ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. यंदा पूरग्रस्त निधीची कपात केली जाणार नाही. पण, दुष्काळीची तीव्रता वाढली तर दुष्काळ निधी कपात करावा लागेल, अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

गाळप हंगाम ८० दिवसांवर ?

साखर कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता आणि उसाची उपलब्धता पाहता, यंदाचा हंगाम सरासरी ८० दिवस चालेल, अशी शक्यता आहे. गतवर्षी हंगाम १०० दिवस चालला होता, तरीही कारखाने तोट्यात गेले आहेत. यंदा हंगाम ८० दिवसांवर आला तर कारखान्यांच्या तोट्यात वाढ होईल. सहकारी कारखाने आर्थिक अडचणीत येतील. इथेनॉल उत्पादन करायचे आहे किंवा नाही, या बाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतेही सूचना दिली नाही. पण, यंदा इथेनॉल उत्पादन होण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

मराठवाड्यात पाण्याअभावी ऊस वाळू लागला

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला आहे. सिंचनासाठीच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मराठवाड्यात पाण्याअभावी ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले तरीही उत्पादनावर, साखर उताऱ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे कृषी विभागाला उसाच्या उपलब्धतेचा फेर आढावा घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *