Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. त्याचदरम्यान जालनाच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी थेट प्रमाणपत्र वाटपाचा नियमच सांगितलाय. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर नियमांचे पालन करणे आणि वंशावळ सिद्ध करणे बंधनकारक असून, आवश्यक पुराव्यांशिवाय दाखले दिले जाणार नाहीत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.  जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, जालना जिल्ह्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा एकूण 5,027 नोंदी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात आतापर्यंत 18,200 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार 377 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व नोंदींची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलीय. यासह SEBC नुसार 35,981 प्रमाणपत्रे देण्यात आलीत. जात पडताळणी समितीकडे प्राप्त झालेल्या 1,664 अर्जांपैकी 1,016 जणांची पडताळणी पूर्ण करून प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे?

कुणबी प्रमाणपत्र हवे असेल तर त्या नागरिकांनी काय करावे, याची माहितीही जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिलीय. कुणबी प्रमाणपत्र हवे असेल तर कार्यालयात येताना नोंदीचे आवश्यक पुरावे सोबत घेऊन यावेत. नियमानुसार अर्ज करावा लागेल. त्याशिवाय दाखले मिळणार नाहीत. यासह वंशावळ सिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमानुसार अर्जदारांना SEBC किंवा कुणबी यापैकी एकाच पर्यायाची निवड करावी लागेल. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यासाठी जाधव यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. राज्यात जातीच्या आधारावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आपले राज्य प्रगतिशील आणि मॉडर्न असल्याचे नमूद करत प्रशासनाने विकासावर भर देण्याचे आवाहन केले आहे. एका विकसित राज्यात जातीचा प्रश्न मागे ठेवून प्रगती आणि विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे , असा संदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *