परदेशवारी होणार अधिक सुलभ; Navi Mumbai International Airport वरून वर्षभर उड्डाण शुल्कात संपूर्ण सवलत

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली असून नव्या विमानतळावरून परदेशी प्रवास अधिक सुकर आणि स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने नवी मुंबईतील नव्या विमानतळासाठी (Navi Mumbai International Airport) लवचिक दर योजनेतील सुधारणांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांना विमान उतरविण्याच्या शुल्कात सुरुवातीच्या संपूर्ण एका वर्षासाठी शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. या सवलतीचा थेट फायदा प्रवाशांना तिकीट दरात कपात होऊन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता ‘मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) नवीन मार्ग” ऐवजी “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग” अशी बदलण्यात आली आहे. यामुळे NMIA वरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात (Landing Charges) भरीव सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
अशी असणार सवलती!
नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग: पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १०० टक्के पूर्ण सूट मिळेल.
५,००० किमी पर्यंतचे कमी अंतराचे (Short-haul) मार्ग: दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत मिळेल.
५,००० किमी पेक्षा जास्त लांब पल्ल्याचे (Long-haul) मार्ग: दुसऱ्या वर्षी ५० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत मिळेल.
अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फेऱ्या: अस्तित्वात असलेल्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास ७५ टक्के पर्यंत सवलत मिळेल.
आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा (Freighter Services): पहिल्या वर्षी ९० टक्के आणि दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत दिली जाईल.
नवी मुंबई विमानतळाला असे होणार फायदे!
विमान कंपन्यांसाठी: हे सुधारित निकष NMIA ला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक बनवतील. यामुळे नवीन हवाई मार्गांचा जलद विकास होईल आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल.
प्रवाशांसाठी: अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्गांमुळे प्रवाशांना अधिक पर्यायी गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि स्वस्त तिकीट दर (किफायतशीर दर) उपलब्ध होतील.
मालवाहू वाहतूक (कार्गो): मालवाहू विमानांसाठी दिलेल्या सवलतींमुळे या भागातील एअर कार्गो कनेक्टिव्हिटीच्या वाढीस मोठा पाठिंबा मिळेल.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) आणि सिडको (CIDCO) यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे सुरुवातीच्या वार्षिक २ कोटी (२० दशलक्ष) प्रवासी क्षमतेवरून पूर्ण विकासानंतर ९ कोटी (९० दशलक्ष) प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन कार्गो हाताळणी क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.



