Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई; ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईनसह पाच जणांना अटक

कल्याण : कल्याणमध्ये अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

महात्मा फुले चौक पोलिस ठाणे, कल्याण येथे दाखल असलेल्या एनडीपीएसच्या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

या कारवाईत आरोपींकडून एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या हेरॉईन किंमत तब्बल ३ कोटी ४१ लाख ८५ हजार रुपये आहे. याशिवाय आरोपींजवळील २९ हजार रुपयांची राेकड आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अमजद युसूफ पठाण हा अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींवर महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, खून, गर्दी व मारामारीसह गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही काही आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान आरोपींनी संघटितपणे एकत्र येऊन अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला. मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींवर मोक्का कलमांची वाढ करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपी सध्या आधारवाडी कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. विशेष मोक्का न्यायालयाच्या आदेशानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *