Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे; लवकरच ब्रिटनलाही मागे टाकण्याची शक्यता, FAS अहवालातून उघड

भारताच्या अण्वस्त्र साठ्यात सातत्याने वाढ होत असून सध्या भारताकडे सुमारे १९० अण्वस्त्रे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा साठा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानपेक्षा २० ने अधिक असून, भारत लवकरच ब्रिटनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्था ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’ने (एफएएस) आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘एफएएस न्यूक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट’चे संचालक हॅन्स क्रिस्टेनसेन यांनी ‘भारताची अण्वस्त्रे – २०२६’ या शीर्षकाखाली हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारताकडे सध्या अण्वस्त्र डागण्याची क्षमता असणाऱ्या नऊ वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहेत. यामध्ये दोन प्रकारची लढाऊ विमाने, जमिनीवरून मारा करणारी सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि समुद्रातून मारा करणाऱ्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश आहे. याशिवाय, आणखी किमान दोन प्रगत यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही वर्षांत त्या तीनही सैन्यदलांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

७३० किलो प्लुटोनियम उपलब्ध

भारताकडे सध्या प्रत्यक्ष तैनातीसाठी १६० हून अधिक अण्वस्त्रे सज्ज आहेत, तर नव्याने तयार होणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी अतिरिक्त अस्त्रे जोडली गेल्यास हा एकूण साठा १९० पर्यंत पोहोचतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. इंटरनॅशनल पॅनेल ऑन फिसाइल मटेरियल्स २०२६ च्या आकडेवारीचा हवाला देत, भारताने सुमारे ७३० किलोग्रॅम वेपन-ग्रेड प्लुटोनियम तयार केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका अण्वस्त्रासाठी साधारणपणे ४ किलोग्रॅम प्लुटोनियम लागते, हे गृहीत धरल्यास भारताकडे उपलब्ध साठ्यातून १४० ते २२५ अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट होते.

‘मि. सिंग आमच्या देशातून निघून जा’, ट्रम्प प्रशासनाची भारतीयांविरोधात वंशद्वेषी जाहिरात

भारताचे ‘नो फर्स्ट युझ’ धोरण कायम

भारताने सुरुवातीपासूनच ‘प्रथम अण्वस्त्र वापर न करण्याचे’ (नो फर्स्ट युझ – NFU) धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शत्रूवर आधी हल्ला करण्याऐवजी, प्रत्युत्तरादाखल कठोर मारा करण्यावर भारताचा भर राहिला आहे. भारताची सागरी अण्वस्त्र क्षमता अधिक भक्कम आणि सुरक्षित होत असल्याने जमिनीवरील यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *