SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई नको ते प्रयत्न करू शकते आणि काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी समोर आली होती.ती म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रमाबाई रणवीर यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेत एका ४७ वर्षीय आईने कौतुकास्पद कामगिरी केली होती.
रमाबाई या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावत ३ हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं. त्यांची ही जिद्द आता क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
रमाबाईची ही गोष्ट समजल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी त्यांना रनिंग शूज देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सचिनच्या ‘Ten X You’ टीमने काही ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून रामाबाईंशी संपर्क साधला. विशेष म्हणजे रामाबाईंकडे स्वतःचा फोन नाही. त्यामुळे त्यांच्या अंबाजोगाईमधील घरी रनिंग शूज पोहोचवण्यात आले.
मात्र, शूज मिळाल्यानंतर रमाबाईनी केलेली गोष्ट आणखी खास होती. त्यांनी आपल्याला मॅरेथॉनबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठीही रनिंग शूज मिळावेत, अशी इच्छा व्यक्त केली. या व्यक्तीने आपल्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यांनी सांगितलं नसतं, तर आपण कदाचित या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाच नसता, असं रामाबाईंनी सांगितलं.
रमाबाईची ही मागणीही मान्य करण्यात आली. त्यानंतर रामाबाई, त्यांच्या दोन मुली आणि मॅरेथॉन आयोजक समितीतील ज्या सदस्याने त्यांना या मॅरेथॉनबद्दल माहिती दिली होती, त्यांच्यासाठीही रनिंग शूजची व्यवस्था करण्यात आली. आपली ही गोष्ट सचिन तेंडुलकर यांनी पाहिली असून, त्यांना आपली जिद्द आवडली, हे समजल्यानंतर रमाबाईना खूप आनंद झाला. मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावलेल्या रामाबाईंना सचिनकडून मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी नक्कीच खास ठरली आहे.



