Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Weather Alert : 24 तासांत हवामान बदलणार! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, महाराष्ट्रात पावसाची घरवापसी होणार; हवामान विभागाचं अपडेट

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत. ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला. तरी देखील पावसाची मोठी तूट जाणवत आहे.

गेल्या काही दिवसात पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. पुढील 2 दिवसात राज्यातील हवामानात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.

ऊन-सावलीचा खेळ सुरु

कोकण विभागात आज गुरुवार रोजी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मागील काही दिवसांपासून या भागात पावसानं उघडीप घेतली असून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. सध्या हवामान कोरडं आणि उष्ण आहे. मात्र, 12 सप्टेंबरनंतर कोकणातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उद्या यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सध्या हलक्या सरींची शक्यता आहे. काही भागात मध्यम पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून पावसानं उघडीप घेतल्यानं या भागातही पावसाची मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक घाटमाथा भागांसाठी उद्या यलो अलर्टदेण्यात आल्यानं पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज कोणताही अलर्ट नाही

पश्चिम महाराष्ट्रात सध्या उष्ण आणि कोरडं हवामान आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीय. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असली, तरी सर्वदूर चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

उद्यापासून हवामानात काहीसा बदल

मराठवाड्यातही सध्या हवामान कोरडं असून आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. उन्हाच्या चटक्यासह पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झालं आहे. मराठवाड्यात चांगला पाऊस कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये उद्यापासून हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात काय परिस्थिती?

विदर्भात सध्या बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं आहे. काही भागांत उष्ण आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया परिसरात उद्यापासून आणि त्यानंतरच्या काळात हलक्या ते मध्यम तसेच काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

एकूणच, सध्या राज्यात पावसाने उघडीप घेतली असली, तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबरपासून राज्यात पाऊस सक्रीय होईल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह बहुतांश महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या या अपडेटमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *