
ठाणे : दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नृत्य सादर केल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कलाकार गौतमी पाटील आणि संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली असून याबाबत राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. दहीहंडी उत्सवात कलाकारांना बोलावून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नृ़त्य सादर केले जात असल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. दहीहंडी कार्यक्रमातील कथित नृत्याचा व्हिडिओही त्यांनी तक्रारीसोबत जोडला आहे. सार्वजनिक जागेवर आक्षेपार्ह नृत्य सादर केल्याप्रकरणी गौतमी पाटील आणि संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पेंडसे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाकडेही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहीहंडी उत्सवातील मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरून यापूर्वीही अश्लीलता आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील सादरीकरणाच्या स्वरूपावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे पेंडसे यांच्या तक्रारीवर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
विकृतीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन
समाजात महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचे नृत्य आणि संवाद सादर होणे योग्य नाही, असे पेंडसे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या सादरीकरणामुळे समाजातील विकृतीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळते, असा आरोपही त्यांनी केला.



