दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाले असून, खरीप हंगाम अडचणीत आला आहे. रब्बी हंगामासमोरही संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी गुरुवारी केली.
रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि आता विदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर गुरुवारी नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासोबत बैठक घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी माजी आ. प्रकाश गजभिये, नागपूर जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांना मदत, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, पशुधनासाठी मदत आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याची तसेच रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्याचीही गरज आहे.
४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना ३५ हजार कोटी रुपयांची आहे. मात्र, आतापर्यंत सरकारने केवळ १० हजार कोटी रुपये दिले असून, तब्बल ४३ लाख शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. कर्जमाफीची रक्कम न मिळाल्याने बँकांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
धानाला छत्तीसगडप्रमाणे ३५ रुपये दर द्या
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही, अशी टीका पवार यांनी केली. छत्तीसगडमध्ये धानाला ३५ रुपये दर दिला जात असल्याचे सांगत महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर ३५ रुपये दर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पार्थ पवारांनी पत्रकारांसमोर वस्तुस्थिती मांडावी
पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हयात असताना ते माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडत होते. पार्थ पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती आणि परिस्थिती जनतेसमोर मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. भाजप आपल्या मित्रपक्षातील नेत्यांना कसे अडचणीत आणू शकते, हे येत्या काळात समोर येईल. अजित पवार यांचा दबदबा होता आणि त्यांच्या मागे आमदारांची ताकद होती. आता परिस्थितीत बदल झाला आहे. त्यामुळे भाजप वित्त खाते सोडणार नाही. ते खाते आपल्याकडेच ठेवणार आहे, असा दावा त्यांनी केला.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे योग्य
एमपीएससीची २३ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलणे ही चांगली बाब आहे; मात्र विद्यार्थ्यांच्या मनात एमपीएससीबद्दल विश्वास आणि प्रतिष्ठा निर्माण होणे महत्त्वाचे आहे, असे रोहित पवार म्हणाले. आम्हाला चांगला अध्यक्ष द्या आणि संपूर्ण सिस्टम बदला. छोट्या अधिकाऱ्याला अडचणीत आणून मोठ्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी त्याचा बळी दिला जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



