आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच ‘एअर अॅम्ब्युलन्स’; Emergency स्थितीत वेळेत उपचार मिळणार

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यासोबतच संपूर्ण पालखी मार्ग डिजिटल यंत्रणेने जोडणारे आरोग्यसंपन्न वारी हे विशेष मोबाइल ॲपही यंदा सादर केले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल.
वारीमार्गावर आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘बाइक ॲम्ब्युलन्स’चा वापर करण्यात येत आहे. मात्र, हृदयविकार, पक्षाघात किंवा अपघात झाल्यास तातडीने उपचार देणे गर्दीमुळे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ‘एअर ॲम्ब्युलन्स’चा निर्णय घेण्यात आला आहे.
वारीदरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ ठिकाणी अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा आणि १५६ प्राथमिक उपचार केंद्रे कार्यरत राहणार आहेत. पंढरपूरमध्येही अतिरिक्त आयसीयू कक्ष, महाआरोग्य शिबिर आणि २४ तास वैद्यकीय सेवा असणार आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंगी, मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, अन्न विक्रेत्यांची आरोग्य तपासणी आणि आरोग्य जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे.
‘एअर अॅम्ब्युलन्स’चा वापर कधी ?
आषाढी एकादशी २५ जुलै रोजी आहे. त्यानुसार २२ ते २९ जुलै या कालावधीत सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने निविदा काढली असून, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होणार आहे. आपत्कालीन स्थितीत गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर येथील हेलिपॅडचा वापर करण्यात येणार आहे.
वारकरी वारीसाठी रातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत पोहोचेपर्यंत आरोग्याच्या आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. -प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री



