Navgan News



Add Space

क्राईम

26 वर्षीय तरुणी त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आली..अन् शेवटी तिची बॉडीच सापडली, नेमकं काय घडलं?

Hyderabad crime news : हैदराबादमधील एका हॉटेलच्या खोलीत 26 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेची ओळख रेनुका अशी असून ती अलवाल परिसरातील रहिवासी होती. एमडी लाइन्सजवळील हॉटेल ग्रँड लॉजमधील एका खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

 

रेनुका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली

प्राथमिक तपासानुसार, रेनुका गुरुवारी रात्री 34 वर्षीय फारूक याच्यासोबत हॉटेलमध्ये आली होती. फारूक हा गोलकोंडा परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही वेळासाठी तो खोलीबाहेर गेला होता. परत आल्यानंतर त्याला रेनुका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, असा त्याचा दावा आहे. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील कारवाई सुरू केली.

 

कुटुंबीयांनी आत्महत्येचा दावा फेटाळला

मात्र, रेनुकाच्या कुटुंबीयांनी आत्महत्येचा दावा फेटाळून लावत तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेत फारूकच्या भूमिकेबाबत त्यांनी गंभीर शंका उपस्थित केली असून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या आक्षेपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलिसांकडून सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवून फारूकला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आत्महत्या आणि हत्या या दोन्ही शक्यतांच्या अनुषंगाने तपास केला जात असून शवविच्छेदन अहवाल आणि न्यायवैद्यक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *