देश-विदेश

पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार


संततधार पावसामुळे खालावलेली कापसाची प्रत, त्याबरोबरच कमी झालेली उत्पादकता या कारणांमुळे पाकिस्तानातील वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. गरज भागविण्यासाठी अमेरिकेतून कापूस आयातीवर भर देण्यात आला असून, जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक १.१९२ लाख गाठींची आयात आजवर करण्यात आली आहे.

अमेरिकन कृषी विभागाच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानला आतापर्यंत सर्वाधिक १.२९२ लाख गाठींची (१६० किलोग्रॅम प्रत्येकी) निर्यात करण्यात आली आहे. अमेरिकन कापसाची आयात करणाऱ्या इतर देशांमध्ये दुसऱ्या स्थानी व्हिएतनाम व त्यानंतर तुर्की, स्वित्झर्लंड, मेक्‍सिको, चीन आणि भारत यांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योगाची गरज भागविण्याकरिता यंदा पाकिस्तानकडून आयातीवर भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात संयुक्‍त राज्य अमेरिका, ब्राझील तसेच अन्य देशांसोबत ३० ते ३५ लाख गाठींच्या आयातीसंदर्भातील करार करण्यात आले आहेत. त्यासोबतच इतर काही देशांमधूनही कापूस आयात कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.

देशांतर्गंत लागणाऱ्या कापसाची गरज भागविण्याच्या उद्देशाने या वर्षी ५.५ लाख गाठींच्या आयातीवर पाकिस्तानने भर दिला आहे. विशेष म्हणजे सरकारी धोरणामुळे पाकिस्तानातील जिनिंग व्यवसायांना टाळे लागले आहे. देशात सुमारे १२०० पेक्षा अधिक जिनिंग उद्योग असले, तरी त्यातील केवळ ४०० जिनिंग व्यवसाय कापसाच्या उपलब्धतेमुळे सुरू होते. त्याचा रोजगारावरही परिणाम झाला आहे.

१८ टक्‍के करामुळे रुईच्या आयातीवर भर

पाकिस्तान सरकारने रुईच्या विक्रीवर १८ टक्‍के कराचे धोरण अवलंबिले आहे. याउलट रुईची आयात करमुक्‍त आहे. त्यामुळेच जिनिंग व्यावसायिकांनी देशांतर्गत प्रक्रिया आणि विक्रीवर भर देण्याऐवजी आयातीसाठी पुढाकार घेतला आहे. हे देखील आयात वाढण्याचे एक कारण सांगितले जाते. याचा परिणाम पाकिस्तानमध्ये कापसाचे दर दबावात आले आहेत. त्याचा फटका त्या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे धागा आयात देखील करमुक्‍त करण्यात आली आहे.

अशी आहे विविध देशांतील आयात (लाख गाठी)

पाकिस्तान : १.१९

व्हिएतनाम : ०.९६

तुर्की : ०.६७

स्वित्झर्लंड : ०.६५

मेक्‍सिको : ०.५९

चीन : ०.५२

भारत : ०.२५८


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *