राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरुन तिढा कायम आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेस नेत्यांचे खटके उडाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद निवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर 288 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. या वादांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षांकडून सुरू आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जागावाटपावरून काँग्रेस सोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार आहे. काँग्रेससोबत आले तर त्यांच्यासोबत निवडणूक लढवली जाणार. अन्यथा त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला आक्रमकरित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाकरे गटाच्या वादावर काँग्रेसची दिल्लीत चर्चा
राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे राज्यात जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटासोबत सुरू असलेल्या वादावरही काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांमध्ये चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेवर प्रश्नच उपस्थित केले.