पेट्रोल 10 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी महागले; देश आर्थिक संकटात..
गेल्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.
अशातच आता पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १० रुपये तर डिझेलच्या ६ रुपये १८ पैसे वाढ करण्यात आली आहे. परिणामी, आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या ग्राहकांवर पुन्हा एकदा मोठा पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरातील वाढीची माहिती समोर येताच नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली होती. १५ जुलैच्या अर्ध्या रात्रीपासून पेट्रोल-डिझेलची ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
काय आहे नवीन पेट्रोल दर?
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आता पाकिस्तानात पेट्रोलच्या दराचा भडका पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी पेट्रोलचे दर ३०० रुपये प्रति लिटरच्या खूपच जवळ पोहचले आहेत. पाकिस्तानात सध्या नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी २६५.६१ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता नवीन दरवाढीनंतर एका लिटर पेट्रोलसाठी 275.60 रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी सध्या पाकिस्तानी ग्राहकांना प्रति लिटरसाठी २७७.४५ रुपये मोजावे लागत आहे. दरवाढीनंतर आता नागरिकांना एका लिटरसाठी 283.63 रुपये लिटर इतकी किंमत मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांत पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तान आर्थिक संकटात
मागील काही काळापासून शेजारील देश पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळवून देखील पाकिस्तान सरकारला महागाई कमी करण्यात यश मिळवता आलेले नाही. अशातच आता पाकिस्तान सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत महागाईचा बोजा सर्वसामान्यांवर टाकण्यात आला आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ लागू केली आहे. पाकिस्तान सरकारच्या वित्त विभागाकडून अधिसूचना जारी करत ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.