ह्यांनी २ एकरात बंगला बांधलाय “; राम शिंदेंचा रोहित पवारांच्या वाढीव प्रॉपर्टीवर प्रश्न
मुंबई/अहमदनगर – कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून येथील एमआयडीसीचा मुद्दा उचलून धरला आहे. पावसाळी अधिवेशनातही त्यांनी ह्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आंदोलनही केल्याचं पाहायला मिळालं.
तर, माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदें आणि रोहित पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं दिसून आलं. आता, पुन्हा एकदा राम शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष्य केलंय. यावेळी, थेट त्यांची प्रॉपर्टी गेल्या तीन वर्षात किती आणि कशी वाढली, याची माहितीच त्यांनी विचारली आहे. तसेच, माझे वडिल सालं घालत होते, तुमचे आजोबा ४ वेळा मुख्यमंत्री होते, असेही त्यांनी म्हटले.
अहमदनगरमधील पाटेगाव खंडाळा एमआयडीसी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. त्यावरुन भाजप आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वार-पलटवार सुरू आहे. पवार यांनी या एमआयडीसीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. या पत्रावरुन आता राम शिंदेंनी एमआयडीसी हा विषय केंद्र सरकारचा आहे का? असा सवाल केला, तर स्पर्धा परिक्षांच्या ‘फी’ वरुन पवार यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे यावेळी रोहित पवार यांनी २ एकरमध्ये बांधलेल्या घराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या घराचा मोठा इश्श्यू केला, माझं घर महाराष्ट्रात गाजलं. मी २ हजार स्वेअर फूटात घरं बांधलं. पण, आता ह्यांनी २ एकरात घर बांधलंय, त्यात अर्धा एकरचं बांधकाम आहे, ह्याचीही चर्चा झाली पाहिजे, असे राम शिंदे यांनी म्हटलं. तसेच, मी लई मोठे-मोठे धंदे करतो असे ते म्हणतात. तुमचे आजोबा ४ वेळा मुख्यमंत्री, चुलते ५ वेळा उपमुख्यमंत्री होते. तर, आमच्या बापानं सालं घातली. आता, मी आमदार झालोय, मंत्री झालोय. माझा नातू करेल ना कधीतरी, तो उभा करेन मोठे-मोठे उद्योगधंदे, असे म्हणत रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
माझी कर्जतमध्ये एकही गुंठा जमिन नाही. तुम्ही तीन वर्षामध्ये किती गुंठे, किती एकर आणि किती जमा केले ते सांगायला पाहिजे. राम शिंदेंच्या नावावर एकरभराचा उतारा काढून दाखवा, नाही निघणार. पण, तुम्ही एवढ्या लवकर एवढं सगळं कसं केलं? असा सवालही राम शिंदेंनी विचारला आहे. राम शिंदे यांनी थेट रोहित पवारांच्या प्रॉपर्टीवाढीवरच भाष्य केलंय,
उद्योगमंत्र्यांनी चौकशी लावली
पाटेगाव खंडाळा येथेच एमआयडीसी व्हावी हा अट्टाहास रोहित पवार फक्त निरव मोदीची जमीन मिळवण्यासाठीच करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. एमआयडीसीच्या जागेमध्ये निरव मोदी यांची जमीन कोणी समाविष्ट केली? कुणाच्या काळात समाविष्ट झाली? कुणी त्यांच्याशी संधान साधले? कोणाचे त्यांना कॉल झाले? याची सखोल चौकशी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लावली आहे, असंही राम शिंदे म्हणाले.