लातूर येथे विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यासाठी अडीच कोटीचा निधी आणि 11 पदे ही मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. या चार जिल्ह्यातील लाखो पशुंना यामुळे आरोग्याची सुविधा मिळणार आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लातूर, धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना त्यासाठी आवश्यक असणारा निधी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. तसेच या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारी अकरा पदे भरण्याचा ही निर्देश देण्यात आले आहेत. याचा लाभ लातूर प्रादेशिक सहआयुक्त कार्यालयाअंतर्गत लातूर जिल्हा धाराशिव नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला होणार आहे. यापूर्वी या जिल्ह्यातील पशुंना झालेल्या रोगाचे निदान मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे प्रयोग शाळेवर अवलंबून राहावे लागत होते. आता या चार जिल्ह्यांना लातूर या ठिकाणी होणाऱ्या प्रयोगशाळेमुळे पशु रोगाचे लवकर निदान होणं सहज शक्य झालं आहे.
राज्यात किती ठिकाणी आहे प्रयोगशाळा?
सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, चिपळूण अशा 7 ठिकाणी विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत. लातूर विभागामध्ये असलेल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची मोठी संख्या विचारात घेता या विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असणे गरजेचे होते. सध्या येथील पशुपक्षांमधील रोगांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे येथे पाठविण्यात येतात. लातूर येथे ही प्रयोगशाळा स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे. या सर्व बाबींचा विचार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
पशुनाही वेळेवर उपचार आवश्यक…
लातूर विभागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यात गाई, म्हशी, बैल तसेच शेळ्या मेंढ्या, कोंबड्या यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लातूर जिल्हा हा देवणी गोवंश, मराठवाडी म्हैस, पशमी व कारवान श्वानसाठी ओळखला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबादी शेळी राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यातील लाल कंधारी गोवंश नावाजलेला आहेच. या सर्व बाबींचा विचार करता या पशुमधील रोगाचे तात्काळ निदान व्हावं आणि पशुचे प्राण वाचावे यासाठी ही प्रयोगशाळा अतिशय महत्त्वाची होती. ही प्रयोगशाळा स्थापन होण्याचा मार्ग मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुकर झाला आहे.
असा होणार फायदा…
मागील अनेक वर्षापासून आमच्या कार्यालयाने सातत्याने याचा पाठपुरावा केला आहे. या भागात होणारा लंम्पी रोग असेल, कोंबड्या मधील बर्ड फ्लू, शेळी, मेंढी यांच्यातील मरतुकीचे वाढणारे प्रमाण असेल, यासारख्या रोगांचे पटकन निदान व्हावं यासाठी ही प्रयोगशाळा स्थापन होणे अतिशय आवश्यक होते. याचा लाभ लाखो पशुपालकांना होणार असल्याची माहिती डॉक्टर नानासाहेब कदम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लातूर यांनी दिली आहे. या प्रयोगशाळेचा लाभ लातूर विभागामध्ये 21 लाख गाई, म्हशी आहेत, 70 लाख शेळ्या आणि मेंढ्या, एक कोटी 80 लाख ह्या कोंबड्याना होणार आहे. तसेच या विभागातील श्वान, घोडे इतर पाळीव प्राण्यांनाही या प्रयोगशाळेमुळे लाभ होणार आहे.