
सर्दी-खोकला अथवा कफ झाल्यास हलक्यात घेऊ नका, कारण ही ओमायक्रॉनची लक्षणे असू शकतात, असे WHO ने म्हटले आहे.
सर्दी, खोकला, थकवा आणि रक्तसंचय …. ही ओमायक्रॉनची चार प्रमुख लक्षणे असल्याचे अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या विश्लेषणातून (US Centers for Disease Control and Prevention analysis) समोर आले आहे. युकेमधील झो कोव्हिड अॅपच्या संशोधनानुसार, मळमळ आणि भूक न लागणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे आहेत. दक्षिण आफ्रिका, अमेरिका, युकेमधील अभ्यासानुसार, ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये संसर्गाची अतिशय झपाट्याने होते. पण या रुग्णांमध्ये लक्षणे नसतात, त्यामुळे रु्गणालयात दाखल होणाऱ्याचे प्रमाणही कमी राहते.
जगभरात ओमायक्रोन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलेले असतानाच कोरोनाची अंताकडे वाटचाल सुरू झाल्याची खूशखबर तज्ञांनी दिली आहे. कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांचे प्रमाण झपाटय़ाने वाढताना दिसत असले तरी रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या किरकोळ असल्याचे तज्ञांनी म्हटलेय.कोरोना विषाणू हा भविष्यात नेहमीच आपल्यासोबत असेल. परंतु ओमायक्रोन क्हेरिएंट रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करेल, ज्यामुळे या कोरोना महामारीचा अंत होऊ शकेल, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट मोनिका गांधी यांनी म्हटले आहे. संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणारे उपाय आणि लसीकरण मोहिमेमुळे मे महिन्यापर्यंत कोरोना हा साथीचा रोग संपुष्टात येईल, असा दावा रशियाचे माजी मुख्य सॅनिटरी डॉक्टर गेनाडी ओनिश्चेंको यांनी केला आहे. जर चांगले, विश्वासार्ह औषधोपचार असतील तर आपल्याला हा आजार सामान्य फ्लूसारखा भासू लागेल, असे रशियन अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष अलेक्झांडर सर्गेयेव्ह यांनी म्हटले आहे.
ओमायक्रोन लाटेदरम्यान ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ते डेल्टा लाटेदरम्यान दाखल रुग्णांपेक्षा 73 टक्के कमी गंभीर स्वरूपाचे होते. हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत मानवी फुप्फुसांसाठी कमी धोकादायक असल्याचेही स्पष्ट झालेय. हा व्हेरिएंट केवळ लसीकरण न झालेल्या लोकांनाच गाठत नाही तर ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे किंवा लसीकरण पूर्ण झालेय अशा व्यक्तींनाही सहज गाठत असल्याचे समोर आले आहे.