
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी ‘ओमायक्रॉन’चे वर्णन ‘विषाणूजन्य सामान्य ताप’ असे केले आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अशी पुस्तीही जोडली.
किशोरवयीन मुलांसाठीच्या लसीकरण मोहिमेची पाहणी केल्यानंतर आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूबद्दल ते म्हणाले, ”ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने होतो, हे खरे आहे, परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेशी तुलना केली तर हा नवा विषाणू अतिशय कमकुवत आहे. तो फक्त एक ‘विषाणूजन्य सामान्य ताप’ आहे. तरीही कोणत्याही रोगाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे (पान २ वर) (पान १ वरून) आणि काळजी घेणे आवश्यक आहे, भयभीत होऊ नये.”
मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले की गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये डेल्टा विषाणूने बाधित असलेल्यांना बरे होण्यासाठी १५-२५ दिवस लागले होते. बरे झाल्यानंतरही अशा तब्येतीच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु ओमायक्रॉनच्या रुग्णांबाबतीत तसे म्हणता येणार नाही. हा विषाणू कमकुवत झाला आहे. तरीही जे अन्य आजारांचेही रुग्ण आहेत, त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळले, त्यापैकी तीन बरे झाले तर अन्य गृहविलगीकरणात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.