Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ST कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार देण्याची मागणी; प्रताप सरनाईक यांना दिले निवेदन

Spread the love

वाढती महागाई आणि इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या दिवाळी भेटीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना

यंदा दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना देण्यात आले.

मंत्री प्रताप सरनाईक हे मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आले असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट दिली जाते. मात्र, यंदा वाढलेली महागाई लक्षात घेता कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी भेटीच्या रकमेत वाढ करणे आवश्यक आहे. राज्यातील इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांनाही सन्मानजनक रक्कम मिळावी, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.

‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून निषेध करण्यात येईल

यंदा ६ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने, सणापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि दिवाळी भेटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आवश्यक निधी ४ नोव्हेंबरपर्यंत न दिल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून निषेध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी याआधी दिला.

दरम्यान, एसटीने सवलत मूल्याची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आणि दिवाळी भेटीची रक्कम देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम ३ नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास ४ नोव्हेंबर रोजी हे निषेध आंदोलन करण्यात येईल. एसटीचा संचित तोटा वाढत असून अपेक्षित प्रवासी उत्पन्न मिळत नाही. त्यातच कर्मचारी देणी, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि अन्य देयकांची थकबाकी वाढत असल्याने महामंडळाला दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळणे कठीण होत आहे, असे बरगे म्हणाले होते.