कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त, २७ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल

संभाजीनगर परिसरातील कचनेर तांडा नं. ५ येथील डोंगर माथ्यावरील शेतात गांजाची लागवड झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी गुरुवार ता. ८ रोजी सकाळी सात वाजता केलेल्या कारवाईत गांजाची तब्बल २४१ लहान-मोठी झाडे जप्त केली आहे.
पोलीसांना मिळाली गोपीनीय माहिती…
कचनेर तांडा डोंगर माथ्यावरील शेतात गांजाची लागवड झाली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी तिची खातरजमा केली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित शेतावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान शेतात गांजाची लहान-मोठी झाडे लागवड केलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी ही सर्व झाडे ताब्यात घेतली.
पंचांसमक्ष झाडांची मोजणी व वजन करण्यात आले असता एकूण २४१ झाडांचे वजन १८२.०२ किलो भरले. त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत २७ लाख ३० हजार ३०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी यमुना मांगीलाल चव्हाण, कवरसिंग रामजी चव्हाण, प्राणहंस गोपा चव्हाण, गणेश प्राणहंस चव्हाण आणि अंकुश गोपा चव्हाण, सर्व रा. कचनेर तांडा, नं. ५, ता. जि. छत्रपती संभाजीनगर, यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या छापा कारवाईत पोलीस विभागासोबत महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. यामध्ये नायब तहसीलदार कैलास वैजीनाथराव वाघमारे, तहसील कार्यालय, छत्रपती संभाजीनगर; सहाय्यक कृषी अधिकारी पूनम डिगंबर जाधव, कृषी अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर; तसेच तलाठी संजय बाजीराव ठोंबे, कचनेर यांचा सहभाग होता.
पोलीस पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे, पोलीस हवालदार विठ्ठल एडके, पांडुरंग बढे, निवृत्ती मदने, रकिब शेख, परमेश्वर आढे, विजयसिंग जारवल, पंकज पाटील, सतीश देवकर, सचिन थोरात, मुंजाजी डोईफोडे, लहू गव्हाणे तसेच महिला पोलीस हवालदार भारती राठोड, सीमा घुगे, अनिता बनसोड, योगिता बोकील यांचा सहभाग होता.
चिकलठाणा पोलिस पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या धडाकेबाज कारवाईमुळे चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत, अवैध वाळू उपसा, अवैध मुरूम उत्खनन, अवैध दारू विक्री,व अवैध गांजा लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. अमली पदार्थांची अवैध लागवड व विक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने अवैध धंदे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.



