राहुल गांधींसह रस्त्यावर झोपलेल्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने मंगळवारी दिल्लीत मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज (७ ऑक्टोबर) पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी खासदारांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी रोखल्याने मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.
एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवरच आक्रमक भूमिका घेत सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केलं आहे. दिल्लीत आज विरोधकांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी विरोधकांना जंतरमंतरवर जाण्यापासून रोखल्यानंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे.
प्रियांका गांधींसह राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांनी आज बसेसच्या माध्यमातून जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी खासदारांच्या या बसेस पोलिसांनी रोखल्यामुळे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रियांका गांधी रस्त्यावर झोपल्या
जंतरमंतरच्या दिशेने जात असलेल्या बसेस पोलिसांनी थांबवल्यानंतर खासदार प्रियांका गांधी या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. यावेळी प्रियांका गांधी या थेट रस्त्यावर झोपल्या. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेतलं. या सर्व आंदोलनादरम्यान दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे.
“प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल…”; राहुल गांधींचा सरकारला इशारा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांवर आणि स्वतःवर दाखल झालेल्या एफआयआरबाबत बोलताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला मोठा इशारा दिला. राहुल गांधी म्हणाले की, “माझ्याविरुद्ध ४५ एफआयआर दाखल झाले आहेत. आता माझी इच्छा आहे की माझ्याविरुद्ध १०० एफआयआर दाखल व्हावेत. कारण प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एका मेडलसारखा आहे”, असं म्हणत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनांनंतर विरोधी खासदारांवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला प्रत्युत्तर दिलं आहे.



