Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रस्त्यांवर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करा; प्रियांका गांधी यांचे केंद्र सरकारला आवाहन

दिल्ली आणि बिहारमध्ये महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर काँग्रेस नेत्या तथा वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

महिलांवरील हे हल्ले केवळ वाढतच नसून ते अधिक हिंसक होत चालल्याचे त्यांनी म्हटले आहे. वायनाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारांना महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले.

“जर आपण आपल्या देशातील महिलांना रस्त्यांवर सुरक्षित वातावरण देऊ शकत नसू, तर मोठ्या योजना आणि घोषणा करण्यात काहीच अर्थ नाही,” असे सांगत प्रियांका गांधींनी  महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. अलीकडच्या काही आठवड्यांत राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात १० सप्टेंबर रोजी स्वरूप नगर येथे १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्या, १६ सप्टेंबर रोजी सदर बाजार भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आणि २१ सप्टेंबर रोजी ६ आणि १७ वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा समावेश आहे. तसेच, बिहारच्या जमुई भागातही एका अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या पार्श्वभूमीवर, महिलांना देशात कुठेही आणि केव्हाही सुरक्षित वाटेल, अशी प्रभावी व्यवस्था उभारण्याची जबाबदारी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांची असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, आपल्या वायनाड दौऱ्यात जास्तीत जास्त नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *