Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात देशातील पहिले ‘स्पेस पार्क’ उभारणार; दीड वर्षात पाच उपग्रह अंतराळात सोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट; २०० कोटींची प्राथमिक गुंतवणूक

महाराष्ट्राला अंतराळ क्षेत्रातील उद्योग, संशोधन आणि नवनवीन कल्पनांचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, राज्यात ‘स्पेस पार्क’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील अशा प्रकारचे हे पहिले ‘स्पेस पार्क’ असेल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

वेंगुर्ला येथे गणपती उत्सवासाठी आपल्या मूळ गावी आले असताना सामंत यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजापूरचे शिंदेसेनेचे आमदार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब आदी उपस्थित होते. उपग्रहाशी संबंधित या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उंच आणि तुलनेने थंड वातावरण असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे. माथेरान तसेच रत्नागिरीजवळील माचाळ या दोन ठिकाणांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे स्वतःचे पाच उपग्रह

महाराष्ट्राचे स्वतःचे पाच उपग्रह असावेत, या उद्देशाने राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही सामंत यांनी सांगितले. पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या ‘वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक-२०२६’मध्ये सहभागी होण्यासाठी ते राज्य सरकारच्या वतीने पॅरिसला गेले होते. याबाबत अधिक माहिती देताना सामंत म्हणाले की, पॅरिसमधील परिषद आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे स्वतःचे पाच उपग्रह विकसित करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या उपग्रहांचा उपयोग कृषी, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, शहर नियोजन, आरोग्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी करण्याची संकल्पना आहे. उपग्रह निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी संबंधित कंपन्यांसोबत चर्चाही झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी सुरुवातीला २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, पुढील काळात या प्रकल्पातून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल निर्माण होण्याची शक्यता संबंधित कंपनीने व्यक्त केल्याचे सामंत यांनी सांगितले.

दीड वर्षात अंतिम निर्णय

उपग्रहाशी संबंधित प्रकल्पासाठी उंच आणि तुलनेने थंड हवामान असलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असून, येत्या वर्ष-दीड वर्षात प्रकल्पाच्या ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ‘स्पेस फेस्ट’चे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात विज्ञान, अंतराळ संशोधन आणि स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रॉकेट, ड्रोन, अंतराळयान आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आमंत्रित करून ‘स्पेस पार्क’मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन उद्योग तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *