तरच गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रवेश मिळणार, कोल्हापूर पोलिसांनी घातल्या अटी; प्रवेशक्रम निश्चित

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ताराबाई रोडमार्गे अंबाबाई मंदिर चौक या मुख्य मिरवणूक मार्गावर प्रवेश करणाऱ्या १४ गणेश मंडळांचा प्रवेश क्रम सोमवारी चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर उपविभाग प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बैठक झाली. यावेळी सर्व मंडळांनी निश्चित केलेल्या क्रमवारीनुसारच मिरवणुकीत सहभागी होण्याचे मान्य केले. चिठ्ठी काढण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने मंडळांना मिरवणुकीतील स्ट्रक्चर १० बाय १२ फूट ठेवण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक मंडळाने मिरवणुकीत फक्त दोन ट्रॉलींचा सहभाग ठेवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. दोन बेस आणि दोन टॉप लावण्याची सूचनाही केली. या वर्षी चिठ्ठीतून पहिल्या तीन क्रमांकावर येणाऱ्या मंडळांना पुढील वर्षी प्रवेश क्रमांकासाठीच्या सोडतीत सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढील वर्षी मिरवणुकीत शेवटी प्रवेश द्यावा लागणार असल्याचेही ठरले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिसूचनेची माहिती देऊन पालन करण्याचे आवाहन मंडळांना केले. सर्व मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी ही क्रमवारी मान्य केली. त्यानुसारच विसर्जन मिरवणुकीत प्रवेश करण्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
निश्चित प्रवेश क्रम १) श्री साई मित्र मंडळ, २) हिंदवी स्पोर्ट्स साकोली कॉर्नर मित्र मंडळ, ३) चौपाटी मित्र मंडळ, ४) रंकाळा तालीम, रंकाळा टॉवर, ५) साकोलीचा राजा गणेश भक्त मंडळ, ६) शिवाजी तालीम मंडळ, आयरेकर गल्ली, ७) आझाद हिंद तरुण मंडळ उर्फ दयावान, ८) वाघाची तालीम, ९) महाराष्ट्र सेवा मंडळ, १०) उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर, ११) भोर तालीम, १२) पॉप्युलर स्पोर्ट्स क्लब, गुरुवार पेठ, १३) रंकाळावेश तालीम मंडळ, १४) क्रांती बॉईज, रंकाळा टॉवर
यंदा दोनच ट्रॉलीची परवानगी दरवर्षी एका मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीत पाच ते सहा ट्रॉलींचा वापर केला जातो. या वर्षी मात्र मंडळांना मिरवणुकीत दोनच ट्रॉलींची परवानगी दिली आहे. मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून त्याची पाहणी केली जाणार आहे. रांगेत एका मंडळाच्या दोनपेक्षा अधिक ट्रॉली दिसल्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी वाहनांची अधिक गर्दी कमी केली जाणार असल्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांनी मंडळांना दिल्या.



