Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

यकृताला संसर्ग कशामुळे होतो ? हेपेटायटिसची लक्षणं कोणती ? यकृताच्या आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यायची ?

आहारावर अवलंबून असते आपली प्रकृती. जीवनशैली, सवयींमधे चांगले वाईट बदल झाले की त्याचे थेट परिणाम प्रकृतीवर होतात. अयोग्य जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आरोग्यावर गंभीर परिणाम यकृतावरही दिसून येतो.

तरुणांमधे यकृताचे संसर्ग आणि यकृताशी संबंधित इतर विविध गंभीर समस्यांचं वाढतं प्रमाण पाहून आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

यकृताचे संसर्ग उदा. हिपॅटायटीस प्रामुख्यानं विषाणू, जीवाणू किंवा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात.
यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे कारण पाचशेहून अधिक अत्यावश्यक कार्य यकृतामुळे पार पडतात. त्यामुळे, यकृतावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही समस्येचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यकृताच्या संसर्गामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केलं तर यकृत निकामी होण्याचा धोका अधिक वाढतो. मात्र, चिंतेची बाब म्हणजे यकृताचा संसर्ग अनेकदा इतका सुप्त स्वरूपाचा असू शकतो की, संबंधित व्यक्तीला त्याची अजिबात जाणीव होत नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या संसर्गांबाबतचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे, आपल्या शरीरात हा विषाणू असल्याची जाणीव लोकांना अनेकदा बराच काळ होत नाही. संसर्ग होऊनही व्यक्ती सामान्य दिसू शकते, आपली दैनंदिन कामं सुरू ठेवू शकते आणि कोणताही विशेष त्रास जाणवत नाही. अनेकदा, यकृताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरच या संसर्गाचं निदान होतं.

हिपॅटायटीस ‘बी’ असो वा ‘सी’, सुरुवातीच्या काळात काही लक्षणं दिसली, तरी ती इतकी सामान्य स्वरूपाची असू शकतात की अनेकदा त्याकडे थकवा, अशक्तपणा किंवा पोटातील किरकोळ अस्वस्थता समजून दुर्लक्ष केलं जातं. सीडीसीच्या आकडेवारीनुसार, हिपॅटायटीस सी असलेल्या सुमारे 75 ते 85 टक्के लोकांमधे कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.

हिपॅटायटीसला मूक आजार का म्हटलं जातं ते पाहूया. संसर्ग झालेला असताना अनेकांमधे कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत आणि हा आजार अनेकदा बराच काळ लक्षात येत नाही. दीर्घकालीन संसर्ग अनेक महिने लक्षणविरहित राहू शकतो. लक्षणं दिसून आलीच, तर ती कदाचित विशिष्ट नसतील. थकवा, भूक मंदावणं किंवा पोटातील अस्वस्थता ज्यांकडे लोक अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्ष करतात.

संक्रमणावर उपचार केले नाही तर यकृताचं गंभीर नुकसान आणि सिरोसिस म्हणजेच यकृत निकामी होणं यांसारखे दीर्घकालीन गंभीर परिणाम उद्भवू शकतात. थकव्याव्यतिरिक्त, हिपॅटायटीस बी किंवा सी मुळे भूक मंदावणं, मळमळ – उलट्या होणं, पोटदुखी, ताप आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

काही व्यक्तींना कावीळ होऊ शकते, ज्यासोबत लघवी आणि विष्ठेच्या रंगात बदल दिसून येतात. महत्त्वाची बाब म्हणजे, यकृताशी संबंधित समस्या बळावत असूनही सुरुवातीच्या टप्प्यावर अनेकदा या आजाराचं निदान होत नाही, ज्यामुळे पुढे जाऊन गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

हिपॅटायटीसचा संसर्ग ओळखण्यासाठी रक्त तपासणी करणं आवश्यक आहे. सीडीसी म्हणजेच Centre for Disease Control and prevention च्या मते, केवळ लक्षणांवरून एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

सतत पोटदुखी, भूक न लागणं, थकवा किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणं जाणवत असतील आणि त्यासोबतच कावीळची लक्षणंही असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वरित तपासणी करून घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं यकृताशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *