सोलापुरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नवा नियम; ऑनलाइन बुकिंग बंधनकारक, २५ दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर

सोलापूर : सणासुदीत गॅस सिलिंडरचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या आदेशानुसार गॅस कंपन्यांनी घरगुती सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक केले आहे. आता २५ दिवसानंतर दुसरा सिलिंडर मिळतो.
त्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा वितरकांमार्फत देखील सिलिंडर बुकिंग करता येतो. त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी व कोड क्रमांक द्यावा लागतो.
मार्च महिन्यात व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा झाला होता. त्यावेळी गॅस गोडावूनबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आता घरगुती ग्राहकांना २५ दिवसानंतरच दुसरा सिलिंडर मिळतो, त्यासाठी ऑनलाइन बुकिंगचे बंधन घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात ११ लाख ग्राहक असून त्यांच्यासाठी (सिलिंडर संपणारे) दररोज २० हजार सिलिंडर लागतात.
ऑनलाइन बुकिंग केल्याशिवाय कोणत्याही वितरकांनी ग्राहकास सिलिंडर देऊ नये, अशा सूचना जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने दिल्या आहेत. ऐनवेळी सिलिंडर संपले आणि आधी बुकिंग केले नसल्यास वितरक त्यांच्याकडील शिल्लक टाकी ग्राहकाला देतो, पण त्यासाठी आधी बुकिंग करून घेतले जाते. त्यानंतर त्या ग्राहकाला पुढील २५ दिवसानंतरच दुसरे गॅस सिलिंडर दिले जाते. आता सणासुदीचे दिवस असून नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार सिलिंडर बुकिंग करून ठेवावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
१२ ऐवजी ४ सिलिंडरसाठीच सबसिडी
केंद्र शासनाने गावागावातील महिलांना होणारा धुराचा त्रास कमी होण्यासाठी ‘उज्ज्वला गॅस योजना’ सुरू केली. त्याअंतर्गत वर्षातील १२ सिलिंडरसाठी दरमहा सरासरी ३०० रुपयांप्रमाणे सबसिडीही दिली. त्यानंतर ही मर्यादा ८ सिलिंडरपर्यंत केली. मात्र, आता १२ महिन्यांतील ४ सिलिंडरसाठीच सबसिडी मिळते. सध्या २६२ रुपये सबसिडी असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यावसायिक गॅस सिलिंडर घेण्यासाठी दिवसांची मर्यादा नाही, कारण त्यावर शासनाकडून सबसिडी दिली जात नाही. पण, घरगुती गॅस सिलिंडरसाठी २५ दिवसांची मर्यादा घातली आहे. त्यासाठी ग्राहकाने आधी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंगशिवाय कोणत्याही ग्राहकाला घरगुती सिलिंडर दिले जात नाही.
सोलापुरातील सिलिंडरची स्थिती
एकूण घरगुती ग्राहक
११.१३ लाख
दररोज लागणारे सिलिंडर
२०,०००
दरमहा लागतात सिलिंडर
५ लाख
सध्या मिळणारी सबिसिडी
२६२ रुपये



