
गणेशोत्सव म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर आणि धार्मिक उत्सव नव्हे, तर माणुसकीची सेवा करण्याची संधीही आहे, सोलापूरातअसा सुंदर संदेश कुंभारी येथील मानाचा राजा गणपती मंडळाने दिला. मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिरातून उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन कुंभारी पंचायत समितीचेसदस्य सूरज संजय पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरात तब्बल १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
रक्तदानातून जीवनदानाचा संदेश
रक्त पेढ्यात जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्याची दखल घेत मंडळाने रक्तदान शिबिराचेही आयोजन केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने युवक आणि नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सूरज पाटील यांनी गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणण्याबरोबरच सेवा करण्याचे मोठे माध्यम आहे. उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता आली आणि गरजू व्यक्तींना मदत करता आली, तर त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते, असे त्यांनी सांगितले. रक्तदानाबाबत बोलताना ते म्हणाले की, रक्ताची गरज कोणाला आणि कधी भासेल, हे सांगता येत नाही. गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळणे म्हणजे त्याच्यासाठी जीवनदान ठरू शकते. त्यामुळे रक्तदान ही केवळ मदत नसून सामाजिक जबाबदारी आहे. युवकांनी आणि नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गावातील नागरिकांचे आरोग्य हा विकासाचाच महत्त्वाचा भाग आहे. विकासकामांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत. गणेश मंडळे, युवक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो, असेही सुरज संजय पाटील यांनी स्पष्ट केले. धार्मिक उत्सवाला आरोग्य तपासणी आणि रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांची जोड देत मंडळाने ‘उत्सवातून सेवा’चा संदेश दिला.
उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गावातील ग्रामस्थांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची ज्योत पेटविणाऱ्या या उपक्रमाचे कुंभारीसह परिसरातून कौतुक होत आहे.



