Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

शिरूर – रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती देवस्थानच्या परंपरेशी निगडीत असलेल्या करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा आणि ढोकसांगवी या गावांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.

बाबुराव कोंडीबा पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे.

अ‍ॅड. पाचंगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, देवस्थानच्या अधिकृत माहितीनुसार, महागणपतीच्या चार बहिणींची मंदिरे करडे, निमगाव, गणेगाव आणि ढोकसांगवी येथे असल्याचा उल्लेख आहे. देवस्थान ट्रस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी विश्वस्त नियुक्त करण्याची पद्धत आहे. त्याच धर्तीवर महागणपतीशी धार्मिक व पारंपरिक नाते असलेल्या या गावांमधून प्रत्येकी एक प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त करावा.

रांजणगावच्या महागणपतीशी या गावांचे धार्मिक नाते असून, देवस्थानच्या परंपरेत या गावांना विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या काळात ‘श्रीं’ची पालखी व द्वारयात्रा या चार गावांशी जोडलेली आहे. या यात्रेदरम्यान हजारो भाविक सहभागी होत असतात. भाविकांचे स्वागत, सेवा-सुविधा आणि यात्रेचे नियोजन यासाठी या चारही गावांतील ग्रामस्थ भक्तिभावाने योगदान देत असतात.

या धार्मिक परंपरेचा विचार करता, या गावांना देवस्थानच्या निर्णयप्रक्रियेतही स्थान मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात महागणपतीची पालखी द्वारयात्रा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडताना भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी गावनिहाय प्रतिनिधित्व उपयुक्त ठरेल, असा मुद्दा मांडण्यात आला आहे.

महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व दिल्यास या गावांचा पारंपरिक धार्मिक मान राखला जाईल. तसेच ग्रामस्थ आणि देवस्थान यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. त्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीच्या घटनेत आवश्यक बदल करून महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांमधून प्रत्येकी एक ग्रामस्थ प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *