रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; …अन्यथा धान्य होणार बंद, साताऱ्यातील २.४७ लाख लाभार्थ्यांचा लाभ धाेक्यात, नेमकं काय कारण?

सातारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि धान्याच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात मिळणारे रेशनचे धान्य बंद होऊ शकते, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ई-केवायसीचे काम ८५.७५ पूर्ण झाले असून, अद्याप दोन लाख ४७ हजार लाभार्थी केवायसीपासून लांब राहिलेले आहेत. जिल्ह्याला एकूण १७ लाख, ३७ हजार ४८८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १४ लाख ८९ हजार ८६८ लाभार्थ्यांची ई-केवायसी नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
मात्र, कऱ्हाडमध्ये ५० हजार ०२८, साताऱ्यात ३६ हजार ६४६, फलटणमध्ये ३४ हजार ३६६, पाटणमध्ये २९ हजार ८२६, खटावमध्ये २३ हजार ६६३, माणमध्ये २१ हजार ५१५, कोरेगावमध्ये १५ हजार ७३०, वाईमध्ये १२ हजार ३७६, जावळीमध्ये ११ हजार, खंडाळ्यात आठ हजार २९२, महाबळेश्वरमध्ये चार हजार १७८ असे एकूण जिल्ह्यातील दोन ४७ हजार ६२० लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित आहे.
ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे, त्यांची यादी संबंधित गावातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडे (रेशन दुकानदार) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी त्वरित आपल्या रेशन दुकानदाराशी आधार कार्डसह संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. गावातील रेशन दुकानावर जाऊन ‘ई-पॉस’ मशिनवर अंगठ्याचा ठसा (बायोमॅट्रिक) देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल,
तसेच मोबाईल ॲपद्वारे नागरिक आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर वरून ”MERA e-KYC” किंवा ”Face eKYC” ॲप डाऊनलोड करून घरबसल्या स्वतःची ई-केवायसी पूर्ण करू शकतात. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी सर्वांनी ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाने केले आहे.



